मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर भर दुपारी तरुणीचा विनयभंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईत नव्यानं सुरू झालेल्या 'नाइट लाइफ'च्या सुरक्षेवरून मतमतांतरं असतानाच शहरातील 'आफ्टरनून लाइफ'ही सुरक्षित नसल्याचं नुकत्याच घडलेल्या एका भयंकर प्रकारातून उघड झालं आहे. मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर भर दुपारी एका विकृत इसमानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
२६ जानेवारी रोजी दुपारी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यातील दृश्ये कोणालाही धक्का बसेल अशीच आहेत. पीडित तरुणी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावरून जात असताना हा प्रकार घडला. पुलावर कोणीही नसल्याचं पाहून एक मनोविकृत तरुण पाठीमागून आला आणि बळजबरीनं तिचं चुंबन घेतलं. त्यानंतर लगेचच त्यानं तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळं घाबरलेली तरुणीही तिथून निघून गेली. मात्र, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या आधारे पोलिसांनी संबंधित विकृताला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला तरुण विकृत असून त्यानं अनेकदा हा प्रकार केल्याचं समजतं. या प्रकारामुळं मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारचा जोरदार निषेध केला आहे. 'खरंतर पोलिसांचा धाक राहिलेला नसल्यानंच अशा घटना घडत आहेत. या नराधमांच्या मुसक्या आवळल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. यासाठी पोलिसांना किती वेळा निवेदनं द्यायची? पोलिसांना हे दिसत नाही का? महिलांच्या सुरक्षेसाठी काय करायचं हे कळत नाही का? ते गोट्या खेळतात का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच वाघ यांनी केली.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-06


Related Photos