बहुसंख्यांक सतर्क राहिले नाहीत तर दिल्लीत पुन्हा ‘मुघल राज’ : तेजस्वी सूर्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्लीतील शाहीन बाग इथे सुरू असलेल्या आंदोलनावर कडाडून टीका केली आहे. शाहीन बाग इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. बहुसंख्य समुदायाने सतर्क रहावं, अन्यथा देशात पुन्हा मुघल शासन परतण्याची शक्यता आहे, असं तेजस्वी सूर्या म्हणाले. तडफदार भाषणांसाठी ओळखले जाणारे तेजस्वी सूर्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत बोलत होते.
बहुसंख्य समुदाय सतर्क न राहिल्यास मुघल राज्य दूर नाही, असं तेजस्वी सूर्या म्हणाले आणि शाहीन बाग आंदोलनावरही निशाणा साधला. तेजस्वी सूर्या यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. गेल्या कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.
तेजस्वी सूर्या आपल्या भाषणात म्हणाले, ‘जुन्या जखमा भरुन काढल्याशिवाय न्यू इंडियाची निर्मिती होऊ शकत नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी सीएए आहे. कुणाचंही नागरिकत्व काढण्यासाठी हा कायदा नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व काढून घेणार नाही. भारतीयांशी सीएएचं काहीही देणंघेणं नाही हे विरोधकांनाही माहित आहे. पण जाणिवपूर्वक विरोध केला जात आहे, जे दुर्दैवी आहे.’
शेजारच्या मुस्लीम बहुसंख्य देशात धार्मिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना सीएएमुळे नागरिकत्व मिळेल. पण याला विरोध केला जात आहे. येणारी पिढी विरोध करणारांना कधीही माफ करणार नाही. विरोधकांना मुद्दे संपू द्यायचे नाहीत, जेणेकरुन ते व्होट बँकसाठी वापरता येतील, असं म्हणत तेजस्वी सूर्या यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
  Print


News - World | Posted : 2020-02-06


Related Photos