४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन : कॅन्सर झाला घाबरू नका !


जिवनात केव्हा कुणास काय होईल सांगता येत नाही. काळ वेळ सांगुन येत नाही. मला कर्करोग कधीकाळी होईल असे कधीच वाटले नाही, त्याला कारणही तसेच आहे. नियमित न चुकता पहाटेला फिरायला जाणे व योगा करने तरी मला प्रोटेस्ट कॅन्सर झालाच. आमची घरची परिस्थिती बेताचीच. संपूर्ण कुटुंब हादरल. मी ही थोडा मनातुन घाबरलोच परंतु मनाचा निश्चिय केला की आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत कॅन्सरशी लढायचं. नागपुर येथे पर्ल हॉस्पीटलचे डॉक्टर सौरभ प्रसाद यांचेकडून उपचार सुरू झाला. १० किमो थेरपी करायची हाती. त्यांचा खर्च प्रति महिणा २५ हजार रू.कुठुन आणयचा पैसा ही चिंता सतावत होती. आजार आणि पैसा या दोन आघाड्यावर मला लढायचा होत. मी पत्रकारीतेत असल्यामुळे काही राजकीय नेत्यांकडून थोडीफार मदत मिळाली परंतु असे किती दिवस चालणार ही विवंचना होतीच.  आजही महिण्याला २० हजार रूपये औषधांवर खर्च होतो. आतापर्यंत १६ किमोथेरेपी केली आहे. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल नागपूर येथे महात्मा फुले जन कल्याण योजने अंतर्गत ऑपरेशन, किमोथेरेपी व रेडीएसन मिळतो परंतु औषधी मिळत नाही. खर तर या योजनेखाली औषधी मिळायला हवी होती. कर्करोगाची औषधी एवढी महाग आहेत की सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरची आहेत. शेवटचा डोज जेनेरीक औषध महिणा ५५ हजार खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. खरच हे सर्वसामान्य मानसांच्या आवाक्याबाहेरचे आहे. 
मुख्यमंत्री व प्रधानमंत्री निधी अंतर्गत मदत मिळते परंतु मुख्यमंत्री व प्रधानमंत्री निधीसाठी प्रयत्न करावा लागतो.  सेलीब्रिटींना जेव्हा कर्करोग होतो. तेव्हा या व्यक्ती विदेशात जाऊन उपचार करतात व त्या माध्यमातुन त्यांचे आयुष्य वाढते. परंतु गरीब व सर्वसामान्य व्यक्ती उपचाराअभावी मृत्युच्या सापळयात सापडतात. कर्करोगावरील औषधाच्या किमती कमी व्हाव्या म्हणून २३ ऑगस्ट २०१८ ला पंतप्रधान भारत सरकार यांना मी सुध्दा पत्र लिहीले होते. परंतु औषधाच्या किंमती आत्तापर्यंत तरी कमी झाल्या नाहीत.   
दंत महाविद्यालय नागपूर यांच्या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हृयातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कॅन्सर पूर्व मुख्य रोगाची लक्षणे ही बातमी वाचली व मला गाडगे महाराजांचे स्मरण झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला असता महाराज पुटपुटले असे गेले कोट्यानकोटी काय रडू एकासाठी!  मलाही वाटू लागले कॅन्सरमुळे माझा मृत्यु अटळ आहेच पण माझ्या जिल्ह्यातील एवढे विद्याथी कर्करोगाच्या जबड्यात सापडणार असतील तर....! कॅन्सर शाप नसून वरदान समजून काहीतरी केले पाहीजे तब्येतीची तमा न बाळगता.  तंबाखु, गुटखा, खर्रा, गुडाखु व कॅन्सर विरोधी पोस्टर्स छापून जिहृयातील दुर्गम भागात सुध्दा गावागावात पोस्टर्स लावने, लोकांना पॉम्पलेटचे वाटप करणे व शाळा / आश्रमशाळेत प्रबोधन करून लोकांत जनजागृतीचे कार्य करीत आहे. (यासाठी खासदार अशोकजी नेते यांचे बरेच सहकार्य मिळाले) आणि हे प्रमाण वाढु नये म्हणून यासाठी मोठया प्रमाणात प्रबोधन व जनजागृतीचे कार्य करण्याची गरज आहे. माझ्याकडे जिल्ह्यात फिरायला व प्रबोधन करायला पैसा नाही म्हणून लोकांसमोर मदतीसाठी हात पसरतो आहे. कुणी ५०० किंवा १००० रू. अशी मदत केली की भाड्याची गाडी करून दुर्गम भागात प्रबोधन करायला जातो. यावेळी हाही अनुभव आला की, लोक देवाच्या नावावर सोन, लाखो रूपये दान करतील परंतु कॅन्सर सारख्या गरजु आजारी मानसाला मदत मागायला गेले की उपदेशाचे डोज पाजतात हे एक दुर्दैव म्हणावे लागेल. 
गडचिरोली जिल्ह्यात गुटखा, तंबाखु, खर्रा व आता गुडाखु नावाचे तंबाखुचे दंतमंजन म्हणून वापर होत असल्याने ९५ टक्के लोकांना व्यसनाने ग्रासले आहे. राज्यात ४० लाख लोकांना तंबाखु, मावा, गुटखा, खर्ऱ्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढणारे संशयीत रूग्ण आढळल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून कॅन्सरची भयानकता किती झपाट्याने वाढत आहे. तेव्हा लोकांनी तंबाखु, गुटखा, खर्रा या व्यसनापासुन शक्यतोवर दुर व्हावे. अशी मागणी कळकळीची विनंती आहे.  यासाठी जनतेमध्ये प्रबोधन व जनजागृतीची फार गरज आहे. कुणाला कन्सर न होवो परंतू दुर्दैवाने कुणाला कॅन्सर झालाच तर घाबरू नका समर्थपणे लढा द्या. जेव्हा मृत्यु यायचा तेव्हा येईलच परंतु कर्करोग झाला म्हणून घाबरून मृत्युला आमंत्रण देवु नका. 
गडचिरोली जिल्हृयातील अतिदुर्गम भागात जायला रस्ते नाहीत. आरोग्याच्या सुविधा नाही, दवाखाने नाही अशातच एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालाच तर उपचाराअभावी मृत्युला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाह. आणि म्हणून कॅन्सर होऊ नये म्हणून तंबाखु, गुटखा, खर्रा या व्यसनापासून लोकांनी दूर व्हायला पाहीजे. जीवन हे अमुल्य आहे व कॅन्सर म्हणजे प्रत्यक्षात मृत्युचा सापळा. कॅन्सर होणार नाही यासाठी तंबाखु, गुडखा, खर्रा, गुडाखू या व्यसनापासून दूर हा व आनंदाने जीवन जगा, घाबरू नका, शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत लढा व धैर्याने सामोरे जा मी गत चार वर्षापासून कॅन्सरशी लढत आहे. कन्हत कन्हत जगायच की हसत हसत हे तुम्हीच ठरवा.कॅन्सरच्या शारीरिक वेदना, यातना मी स्वतः भोगतो आहे. हे शब्दास सांगणे कठिण  आहे. म्हणुन आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्यसनापासुन जनतेला सावध करण्यासाठी या लेखाच्या माध्यमातुन हा छोटासा प्रयत्न.

मारोती मेश्राम
कॅन्सरग्रस्त रूग्ण
मो- ९४२७३२४४७  Print


News - Editorial | Posted : 2020-02-04


Related Photos