पानवडाळा ग्रामपंचायतीचा सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ग्रामपंचायत पानवडाळा ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील सरपंच प्रदीप शंकर महाकुलकर (४८) यास १५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारयांनी रंगेहात पकडले. यातील तक्रारदार हे घोडपेठ (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून ते पेंटींगचे काम करतात. सन २०१९ ते २०२० मध्ये ग्रामपंचायत जना, काणसा, पानवडाळा, टाकळी, चंदनखेडी आदी गावांची स्वच्छ भारत मिशनचे फलक तयार करून ते संबंधित ग्रामपंचायतच्या हद्दीत नियोजित ठिकाणी लावण्याचे काम तक्रारदार यांनी केले आहे. त्याबाबतचे बिल तयार करून तक्रारदार यांनी संबंधित ग्रामपंचायत सचिवांजवळ दिले होते. सदर बिलाबाबत तक्रारदार हे ग्रामपंचायत सचिव यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास ८ हजार रुपयांचा चेक तयार करून त्यावर सही केलेली आहे. परंतु सरपंच महाकुलकर यांनी सही केलेली नाही व तो चेक त्यांनी स्वतःजवळ ठेवलेला आहे. तुम्ही सरपंचांना भेटून तुमचा चेक घेवून जा, त्यावरून तक्रारदार हे सरपंचांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास ८ हजार रुपयांचा चेक देण्यासाठी १५०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराची सरपंच प्रदीप शंकर महाकुलकर यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर यांनी सरपंच यांच्याविरुद्ध सापळा रचून १५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले व वरोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर येथील पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर, संतोष येलपुलवार, संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे, रोशन चांदेकर, रामचंद्र ठाकरे यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-03


Related Photos