कुरखेडा तालुक्यातील दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याकरिता महिलांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन


- पोलीस सहकार्य करीत नसल्याची तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कुरखेडा :
तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. याचा त्रास नागरिकांना, विशेष करून महिला व युवतींना सहन करावा लागतो. त्यामुळे गावातील दारूविक्री थांबावी आणि विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील सात गावांतील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदनाद्वारे केली. तालुक्यातील पोलीस तक्रारी ऐकून घेत नसल्याचेही महिलांनी यावेळी सांगितले.
तालुक्यातील तळेगाव, वाकडी, जांभूळखेडा, आंबेटोला, मालदुगी, मोहगाव, साश्रूटोला या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला सातत्याने दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण मुजोर विक्रेते कुणालाही न जुमानता दारूविक्री करीतच आहे. या विक्रेत्यांवर कारवाई करावी यासाठी महिला वारंवार पोलिसांना भेटल्या. पण पोलीस सहकार्य करीत नसल्याने निवेदनात नमूद आहे. त्यामुळे विक्रेते खुलेआम दारूविक्री करीत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. काहीच दिवसांपूर्वी वाकडी येथील एका महिलेला व एका इसमाला दारूविक्रेत्यांनी मारहाण केली. पण त्यांच्यावरही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
या सर्व गावातून कुरखेडा शहरात दारूचा पुरवठा केला जातो. बीट जमदारही आमचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचे महिलांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना सांगितले व विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच तालुका पोलिसांनी आम्हाला सहकारी करावे अशी विंनंतीही त्यांनी अधीक्षकांना केली. विक्रेत्यांवर आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी महिलांना दिले. पोलीस विभागाचेही महिलांना सहकार्य मिळण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सात गावातील १८ महिला यावेळी उपस्थित होत्या.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-03


Related Photos