पेसाअंतर्गत येणाऱ्या देलनवाडी ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी उमेदवारांवर अन्याय


- बनावट कागदपत्रांच्या आधारे केली पदभरती

- अन्यायग्रस्त युवकांचा पत्रकार परिषदेत आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत ही पेसा कायदा १९९६ अंतर्गत येत असताना आणि गैरआदिवासी उमेदवाराने बनावट कागदपत्रे सादर केली असतानाही पाणी पुरवठा व दिवाबत्ती या पदासाठी बेकायदेशीर निवड प्रक्रिया राबवून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी आदिवासी उमेदवारांवर अन्याय केला आहे, असा स्पष्ट आरोप ग्रामपंचायत सदस्य गंगाधर नारायण ढोक व जाणीवपूर्वक अपात्र केलेले आदिवासी उमेदवार प्रदीप तुकाराम घरात, मंगलदास साखरे, नंदकिशोर धारणे यांनी २४ जानेवारी २०२० रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
पेसा कायदा अंतर्गत येत असलेल्या देलनवाडी ग्रामपंचायतीमध्ये पंपचालक या पदाऐवजी पाणीपुरवठा व दिवाबत्ती हे पद निर्माण करण्यात आले. या पदासाठी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत निवड प्रक्रिया राबवण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण २१ उमेदवारांनी अर्ज सादर केले. प्राथमिक निवड प्रक्रियेत १४ उमेदवारांना विविध कारणे देऊन अपात्र घोषित करण्यात आले. त्यात जात- जमातीचा चुकीचा उल्लेख करणे, खोटे दस्तऐवज अर्जाला जोडणे, बारावीची गुणपत्रिका सादर न करणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. परंतु निवड झालेला उमेदवार हा गैरआदिवासी आहे. तसेच त्याने अर्जाला जोडलेले दस्तऐवज बनावट असूनही त्याची पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती या पदासाठी निवड करण्यात आली. या बनावट कागदपत्रांमध्ये प्लंबर मेकॅनिक या व्यवसायास कोणतीही अधिकृत परवानगी नसलेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साकोली या संस्थेमार्फत दिलेला डिप्लोमा तसेच गुणपत्रिका अर्जला जोडलेली आहे. या संस्थेला प्लंबर मेकॅनिक या व्यवसायासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना दिलेला डिप्लोमा व गुणपत्रिका ही अवैध असते. असे असतानाही कोणतीही चौकशी न करता देलनवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी सदर पदासाठी केलेली निवड ही संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे. या गैरप्रकाराबाबत २४ डिसेंबर २०१९ रोजी आरमोरी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. परंतु त्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्यांच्या स्तरावरून करण्यात आली नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
या निवड प्रक्रियेत जाणीवपूर्वक अपात्र ठरलेले उमेदवार प्रदीप घरत यांनी संपूर्ण पुराव्यासहित पत्रकार परिषदेत ही बाब उघडकीस आणली. निवड झालेल्या उमेदवाराने ज्या  संस्थेमधून बनावट प्रमाणपत्र मिळवले या संस्थेकडे प्लंबर मेकॅनिक या व्यवसायास कोणतीही अधिकृत मान्यता नाही, असे पत्र भंडारा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या नावासहित स्वाक्षरीचे पत्र प्रदीप घरत यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. तसेच त्यांनी राज्यपाल, आदिवासी विभाग आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात यावी. तसेच आदिवासी उमेदवारांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणीही गंगाधर नारायण ढोक व जाणीवपूर्वक अपात्र केलेले आदिवासी उमेदवार प्रदीप तुकाराम घरात, मंगलदास साखरे, नंदकिशोर धारणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. या संदर्भात देलनवादी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक माकडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा पर्यन्त केला असता संपर्क होऊ शकला नाही.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-25


Related Photos