गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची आवश्यकता


- जिल्हावासियांचा सूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र राज्याच्या सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळातील खातेवाटप करण्यात आले. यात गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र ते स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांची व परिस्थितीची इत्थंभूत माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने व तत्काळ ठोस निर्णय घेताना अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेच सोपविण्याची आवश्यकता असल्याचा सूर जिल्हावासियांकडून उमटत आहे.
गडचिरोलीच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी काॅंग्रेसचे दमदार नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते स्थानिक नेते असून त्यांना गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांसह पूर्व विदर्भातील परिस्थितीची व महत्त्वाच्या समस्यांची जाण आहे. वडेट्टीवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या नेहमी संपर्कात राहत असून या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ता व जनतेशी जवळीक असल्याने चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तातडीने ठोस निर्णय सुद्धा घेऊ शकतात. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम हे सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी असून त्यांना या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व समस्यांची सुद्धा जाण आहे. यापूर्वी धर्मरावबाबा आत्राम हे राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार व धर्मरावबाबा आत्राम अशा स्थानिक नेत्यांकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेत यात तिळमात्र शंका नाही. स्थानिक नेत्यांमुळे जिल्ह्यातील सुरजागड सारखे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील व या जिल्ह्यातील समस्या सुद्धा प्राधान्याने सुटण्यास मोलाची मदत होईल. याउलट गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेले एकनाथ शिंदे हे बाहेर जिल्ह्यातील नेते असल्याने त्यांना गडचिरोली जिल्ह्याची फारसी माहिती नाही. शिवाय या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व समस्यांची सुद्धा जाण नसल्याने ही प्रश्ने मार्गी लावण्यास त्यांना अनेक अडचणी येण्याची शक्यता असल्याचा सूर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेमध्ये उमटत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने विजय वडेट्टीवार किंवा धर्मरावबाबा आत्राम यासारख्या स्थानिक नेत्यांकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमत्रीपद सोपविल्यास जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल व जिल्ह्यातील सुरजागड सारखी प्रश्ने लवकरात लवकर सुटण्यास मोलाची मदत होईल, असा आशवादही जिल्हावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक विभागातील कामांचा आढावा घेतला. यावेळी सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत तत्काळ ठोस निर्णय घेण्यात शिंदे यांना अडचण आल्याचे जाणवले. पालकमंत्री शिंदे हे स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने महत्त्वाच्या वेळी ते या जिल्ह्याला भेट देण्यास अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेच सोपविण्यात यावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-24


Related Photos