येनापूर परीसरात वाघाचा धुमाकूळ, सोमनपल्लीत बैलाचा पाडला फडशा


- वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
चामोर्शी तालुक्यातील येनापूर परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून काल २१ जानेवारी रोजी सोमनपल्ली गावालगतच वाघाने बैलाचा फडशा पाडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.
काल २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सोमनपल्ली येथील देवाजी लचय्या जंपलवार हे शेतातून गुरे घेवून घराकडे येत असताना गावापासून एक किमी अंतरावर रामक्रिष्णापूर मार्गावर वाघाने बैलावर झडप घालून त्याला ठार केले. यानंतर शेतकरी जंपलवार हे घाबरलेल्या अवस्थेत गावात आले. घडलेल्या घटनेबाबत गावात माहिती दिली. यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या घटनेत बैलमालक जंपलवार यांचे अंदाजे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांची परीस्थिती हलाखीची असून शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी तसेच वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच निलकंठ निखाडे यांच्यासह नागरीकांनी केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-22


Related Photos