महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त : मंत्रिमंडळाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
ठाकरे सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षकांना सवलतीच्या दरात हा चित्रपट पाहता येईल. तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहीमेवर आधारित असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 
कलाकारांचा दमदार अभिनय आणि अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या साहसी दृश्यांमुळे 'तान्हाजी' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. आतापर्यंत हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री कधी होणार, याची प्रतिक्षा सर्वांना होती. 
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून सर्वांना या निर्णयाची प्रतिक्षा होती. अखेर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.   Print


News - Rajy | Posted : 2020-01-22


Related Photos