वडिलास ठार मारणाऱ्या मुलास आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा


- गडचिरोलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
माहेरी निघून गेलेल्या पत्नीस व मुलास दिवाळीच्या सणाला घरी घेवून येण्याच्या कारणावरून वडिलाशी भांडण करून काठीने जिवानिशी ठार करणारया आरोपी मुलास आजीवर कारवास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी बुधवार, १५ जानेवारी २०२० रोजी सुनावली आहे. हरिराम कोडू मडावी (३७) रा. जांभळी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हकीकत अशी की, आरोपी हरिराम कोडू मडावी याचे त्याची पत्नी पुनाबाई मडावी हिच्यासोबत भांडण झाल्याने मुलांना सोबत घेवून १० दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी गावात दिवाळीचा सण असल्याने आरोपीने वडीलास दिवाळीचा सण असून घरी तुझे नातू व सून नाही. तू सून आणि नातवांना दिवाळी सण साजरा करण्याकरिता घरी का आणला नाहीस. यापेक्ष तूच घरातून निघून जावून मेला असतास तर बरे झाले असते असे म्हणून भांडण करून स्वयंपाक खोलीतील चुलीतील काठी वडिलाच्या डोक्यावर मारून जागीच ठार केले. याबाबत फिर्यादी तुसारोबाई कोडू मडावी हिने तोंडी तक्रार दिली. यावरून आरोपीविरुद्ध कोरची पोलिस स्टेशन येथे अपराध क्र. ५७/२०१७ भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यासत आला. पोलिस उपनिरीक्षक आर. आर. फार्णे यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून भादंविच्या कलम ३०२ अन्वये १५ जानेवारी २०२० रोजी गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी आजन्म कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-15


Related Photos