आपची ७० उमेदवारांची यादी जाहीर : विद्यमान १५ आमदारांचं तिकीट कापलं तर १४ नव्या चेहऱ्यांना संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पार्टीकडून १५ विद्यमान आमदारांना या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पार्टीच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याविषयी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, पार्टीकडून आपल्या स्तरावर सर्व आमदारांच्या कामाचा सर्व्हे करण्यात आला आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसार तिकिटांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्यांचे तिकीट कापण्यात आले आहे, ते आता कोणताही आरोप करत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे मनीष सिसोदिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. यावर बोलताना मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, ज्या लोकांना काँग्रेस आणि भाजपा यासारख्या पक्षांतून निराशा मिळाली आहे, ते आम आदमी पार्टीत आले आहेत. त्यांची लोकांध्ये असलेली प्रतिमा पाहून त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत १४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.  Print


News - World | Posted : 2020-01-15


Related Photos