डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ३५० फूट होणार : मंत्रिमंडळाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फूटांनी वाढवण्यात येणार असून आता हा पुतळा ३५० फूटांचा असणार आहे. तर, चबुतऱ्याची उंची ही १०० फुट कायम असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी स्मारकातील पुतळ्यांची उंची ही २५० फुटांची होती. आता या निर्णयानंतर पुतळ्याची उंची ३५० फूट होणार आहे. तर, चबुतऱ्याची उंची पूर्वीसारखी १०० फूट असणार आहे. हा पुतळा कांस्याचा असणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या स्मारकाचे वास्तूविशारद म्हणून शशी प्रभू काम पाहणार आहेत. तर, बांधकामाबाबतची जबाबदारी एमएमआरडीएकडे देण्यात आली असून सामाजिक न्याय विभागाकडे यावर देखरेख ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये ६.० मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असणार आहे.
येत्या दोन वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभा निवडणुकीआधी ऑक्टोबर २००५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतरही स्मारकाच्या कामात फारशी प्रगती नसल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी होती.  Print


News - Rajy | Posted : 2020-01-15


Related Photos