वैनगंगा नदीत नाव उलटून दोघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
 तालुक्यातील कढोली येथील वैनगंगा नदी पात्रात मयतीसाठी येणाऱ्या लोकांची नाव उलटल्याने दोघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यांचा वृत्त लिहिस्तोवर शोध लागला नाही. रामचंद्र हनुजी पेंद्राम (४०) व परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे नदीत वाहून गेलेल्यांची नावे आहेत. तर या घटनेत सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. सदर घटना मंगळवार, १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
कढोली येथील रामबाई कन्नाके (६५) यांच्या मय्यतीला नेणाऱ्या ऐकून ८ जणांना नावाडी नावेत बसवून वैनगंगा नदीच्या तळोधी घाटावरून कढोली घाटाकडे घेऊन येत होता. दरम्यान नदीच्या पात्रात नाव उलटली. यात रामचंद्र हनुजी पेंद्राम व परशुराम वाघु आत्राम हे दोघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यांचा अद्यापही शोध लागला नाही. मात्र या घटनेत नावाड्यासह सहाजण सुखरूप नदी पात्राबाहेर आली आहेत. यामध्ये अमोल सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (६०), केशव मोहन कन्नाके (४०), गंगाधर सोनू वेलादी (५५), संदीप देवराव कन्नाके (३५), कमलाबाई देवराव कन्नाके (५५) सर्व रा. राजगोपालपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली तर नाव चालक पुनाजी महागु मेश्राम (५५) रा. कढोली यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पोलीस कर्मचारी, तहसीलदार श्रीमती कुमरे व संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोन व्यक्तींचा अद्यापही पत्ता लागला नसल्यामुळे रेस्क्यू टीम शोध घेत आहे. या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर व नातेवाईकांवर मोठा आघात झाला असून गावात शोककळा पसरली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-01-14


Related Photos