ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार : वाघाचे डोके आणि चारही पंजे गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात मध्ये वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ माजली आहे. सदर घटणा शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. दरम्यान मृत वाघाचे डोके आणि चारही पंजे गायब असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील भूज उपक्षेत्रातील मुडझा नियतक्षेत्र आहे. तेथे कक्ष क्रमांक ११७९ मध्ये वाघ मृतावस्थेत असल्याचे तेथील महिलांच्या निदर्शनास आले. वनविभागास सदर माहिती प्राप्त होताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. यावेळी सदर मृत वाघाचे डोके आणि चारही पंजे धडापासून वेगळे करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले.घटनास्थळी एका गायीचे मृत शव प्राप्त झाले असून पुढील चौकशी करता गायमालक व गुराखी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी व तपासणी करण्यास वनविभागाने प्रारंभ केला आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समितीनुसार घटनास्थळाच्या आजूबाजूस पाचशे मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुराव्या शोधण्यासाठी तपासून पाहण्यात आले. सदर मृत वाघाचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ.कुंदन पोडचलवार, डॉ.पराग खोब्रागडे, डॉ. संतोष गव्हारे या चमूने केले. यावेळी एनटीसीएचे अधिकारी हेमंत कामडी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया घटनास्थळीच पूर्ण करण्यासाठी दीड तास लागले. सर्वांच्या उपस्थितीत वाघाचे दहन करण्यात आले.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-01-12


Related Photos