शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अब्दुल सत्तार मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं. त्यामुळे अनुभव आणि राजकीय कारकिर्द मोठी असूनही दुय्यम दर्जा दिल्याबद्दल सत्तार अस्वस्थ होते. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेसच्या हाती देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने सत्तार आणखीनच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी आज राज्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे सहा आमदार आहेत. काँग्रेसचा एकही आमदार नाही. जिल्हापरिषदेत शिवसेनेचे १८ सदस्य आहेत. तर काँग्रेसचे जिल्हा परिषदेत अवघे दहा सदस्य असताना काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हा निर्णय घेताना शिवसेनेने सत्तार यांना विश्वासात घेतलं नव्हतं. त्यामुळे सत्तार नाराज होते. हे सुद्धा त्यांच्या राजीनाम्या मागचं कारण असू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.   Print


News - Rajy | Posted : 2020-01-04


Related Photos