गडचिरोली पोलिसांसमोर ५ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण


- ३ महिला व २ पुरुष नक्षलींचा समावेश, नक्षल चळवळीला मोठा हादरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली पोलिसांसमोर ५ जहाल नक्षलवाद्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी आत्मसमर्पण केले. त्यात ३ महिला व २ पुरुष नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर सुमारे २७ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अजय उर्फ मनेसिंग फागुराम कुडयामी, राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी, सपना उर्फ रुखमा दोनू वड्डे, गुन्नी उर्फ बेहरी वसंती मनकेर मडावी व सुनील उर्फ फुलसिंग सुजान होळी यांचा समावेश आहे. यातील अजय उर्फ मनेसिंग कुडयामी हा प्लॉटून क्रमांक ३ चा उपकमांडर होता. २०१९ या वर्षात १ कोटी ८० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ३४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, २२ नक्षल्यांना अटक, तर ९ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यंदा नक्षल्यांचे वरिष्ठ कॅडर आत्मसमर्पण करण्याचे प्रमाण अधिक होते. आतापर्यंत जेवढ्या डीव्हीसींनी आत्मसमर्पण केले; त्यातील ५० टक्के डीव्हीसींचे आत्मसमर्पण यंदाचे आहे, असे बलकवडे म्हणाले.
केवळ बंदुकीच्या गोळीने नक्षलवाद संपणार नाही, हे लक्षात आल्याने पोलिस विभागाने जनजागरण मेळावे, ग्रामभेटी इत्यादींच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश येत असून, नक्षल्यांचा जनाधार तुटत आहे आणि त्यामुळेच दलम सदस्य आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात येत आहेत, असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. जनजागरण मेळाव्यांमध्ये १५०० समस्यांची निवेदने प्राप्त झाली. त्यापैकी ३६० समस्या पोलिसांनी पुढाकार घेऊन सोडविल्या. यंदा पोलिस विभागाने प्रथमच ५८ ठिकाणी पेरणीपूर्वी कृषी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले. पुढील वर्षी १० उपविभागांमध्ये कृषिविषयक यंत्रे शेतकऱ्यांच्या समुहांना मोफत देण्याची योजना असल्याची माहितीही बलकवडे यांनी दिली. पुढील वर्षी आलापल्ली ते भामरागड मार्गावर ३३ केव्हीचे ५ नवीन स्टेशन उभारण्यात येणार असून, याद्वारे भामरागड परिसरातील गावांचा वीजपुरवठा अख्ंडित सुरु राहील, अशी माहितीही बलकवडे यांनी दिली. नेलगुंडा परिसरात झालेल्या चकमकीत ठार झालेले दोन इसम हे साधे नागरिक नव्हते, तर ते नक्षलीच होते, असे पोलिस अधीक्षकांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग व सुदर्शन उपस्थित होते.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-12-31






Related Photos