४६ महिलांना मिळाला गर्भाशयाच्या आजारापासून दिलासा


- मा दंतेश्वरी दवाखान्यात शिबीर : १० डॉक्टरांच्या चमूने केले उपचार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात शिबिरात गर्भाशयाशी संबंधित आजारांवर उपचारासाठी शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यात ४६ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासह छत्तीसगड येथील महिलांचाही यात समावेश होता. महाराष्ट्रासह बाहेर राज्यातून आलेल्या वैद्यकीय तज्ञांनी शिबिरात उपचार केले.
गर्भाशयाशी संबंधित विविध विकार व त्रासाकडे बहुतेक महिला दुर्लक्षा करतात. परिणामी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सर्च मध्ये गर्भाशयाशी सबंधित आजारावर उपचारासाठी येत असलेल्या महिला अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करत असल्याचे सातत्याने निदर्शनास येते.  अशा प्रकारच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी सर्चमध्ये शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी तब्बल ४६ महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयातील गाठी, औषधांनी न थांबणारा गर्भाशयातील रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे, थांबलेली पाळी पुन्हा सुरु होणे, अशा विकारांचा समावेश होता. डॉ. आशिष कुबडे, डॉ. शिवा मूर्ती, डॉ. शारदा मूर्ती यांच्यासह डॉ. गुरुप्रसाद, डॉ. मंगला घिसाळ, डॉ. श्रद्धा कुटे, डॉ. नितिन अरसुले, डॉ. निखिल सोनवणे यांनी शस्त्रक्रिया केल्या. डॉ. सचिन डोंगरवार आणि डॉ. प्रतिभा लांजेवार यांनी भूलतज्ञ म्हणून काम पहिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि यवतमाळ येथील डी. एम. एम. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना फ़िजिओथेरपीचे उपचार देत आहेत. दवाखान्याच्या संचालक डॉ. राणी बांग यांच्या मार्गदर्शनात डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल काळकोंडे, डॉ. मयुरी भलावी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. दत्ता भलावी, डॉ. कोमल भट आणि संपूर्ण स्टाफ ने शिबिराचे नियोजन केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-27


Related Photos