अजय कंकडालवार यांच्या गळ्यात जिप अध्यक्षपदाची माळ पडण्याचे जवळपास निश्चित


- जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी आविसंची भूमिका ठरणार निर्णायक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण गडचिरोली जिल्हावासियांचे लक्ष लागलेल्या व सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारी २०२० रोजी होऊ घातली आहे. या निवडणूक अगदी काहीच दिवस शिल्लक असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचाली जोरात सुरू आहेत. या निवडणुकीसाठी गणितांची जुळवाजुळव बघता विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडण्याचे जवळपास निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेची दावेदारी करणाऱ्या व सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपा व काॅंग्रेस या दोन्ही गटांकडून कंकडालवार यांच्या नावाला फारसा विरोध नाही. तसेच बहुतांशी सदस्यांची कंकडालवार यांना पसंती असल्याने आणि ते सर्वांना जुळवून घेत असल्याने अध्यक्ष पदाची खुर्ची कंकडालवार यांनाच मिळणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी आदिवासी विद्यार्थी संघाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने आणि अजय कंकडालवार हे अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असल्याने अध्यक्ष पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सध्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काॅंग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात आली. त्यावेळेस भाजपाकडे अध्यक्ष, आविसंकडे उपाध्यक्ष तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे सभापतिपद देण्यात आले. आता अडीच वर्षांनंतर अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून नव्या आरक्षणानुसार ३ जानेवारी २०२० रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षांचे पदाधिकारी व सदस्यांच्या बैठका घेऊन समिकरणे जुळविण्यात येत आहे. सत्ता स्थापनेचे गणित जुळवित असताना आदिवासी विद्यार्थी संघाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजपा, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांना आविसंना सोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा दावा करता येणार नाही. आविसंला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही गटाला सत्ता स्थापन करता येऊ शकत नाही. त्यामुळे अजय कंकडालवार यांना अध्यक्ष पदाची मोठी संधी प्राप्त झाली असून ते या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कंकडालवार यांनी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन विकास कामे करीत असतात. शिवाय सर्व पक्षांच्या पदाधिकारयांशी ते जुळवू घेत असतात. त्यामुळे त्यांच्या नावाला कोणत्याही पक्षाचा व गटाचा विरोध नसल्याचे दिसून येत असून बहुतांश जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या बाजुने आहेत. त्यामुळे अजय कंकडालवार यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी ३ तारखेच्या निवडणुकीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल हे मात्र तितकेच खरे !
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-26


Related Photos