जातीवाचक शिवीगाळ करून दुःखापत करणाऱ्या आरोपीस ३ वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा


- गडचिरोलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरे यांचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जातीवाचक शिवीगाळ करून दुःखापत करणारया आरोपीस ३ वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी गुरुवार, २६ डिसेंबर २०१९ रोजी सुनावली आहे. सविस्तर हकीकत अशी की, अशोक रामदास बोदेले (५५) रा. आंधळी, ता, कुरखेडा, जि. गडचिरोली हे ७ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी त्यांच्या सांदवाडीत गाय आली असता तिला हाकलत बुद्ध विहिराच्या समोरील रस्त्याने जात असताना आरोपी विश्वनाथ यशवंत गहाणे (४८) रा. आंधळी याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून त्या काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याने फिर्यादीने तक्रार दाखल केलीी. या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन कुरखेडा येथे अपराध क्रमांक ५६/२०१५ भादंवी कलम ३२४, सहकलम (३) (१) (१०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांनी केला असून तपासादरम्यान आरोपीस अटक करून गुन्ह्यात वापरलेली काठी हस्तगत करण्यात आली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून २६ डिसेंबर २०१९ रोजी गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी विश्वनाथ यशवंत गहाणे यास अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलम (३) (१) (१०) अन्वये ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा व १ हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम ३२४ अन्वये २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-26


Related Photos