उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : गोळीबारात लष्करी अधिकारी शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात एक भारतीय लष्करी अधिकारी शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात असून या भागात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
पाकिस्तानी सैनिकांनी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर शहीद झाल्याची माहिती हाती आली असून भारतीय जवानांनी पाकिस्तानचा जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा चौक्यांचा भारतीय जवानांनी वेध घेतला असून पाकची एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. भारताच्या गोळीबारात पाकचे ५ सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा भागात जवळपास ४८ तास कोणत्याही प्रकारच्या गोळीबाराच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र आज पाकिस्तानी सैन्याने कुरापत काढल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून उरी सेक्टरमधील सिलीकोट, नांबला, हथलंगा व जवळपासच्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तसेच कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही स्थानिक नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय उरी सेक्टरसह संपूर्ण उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या सर्व सुरक्षा चौक्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
याआधी रविवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने नौशेरा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. २१ आणि २२ डिसेंबर रोजीही मेंढर, कृष्णा घाटी आणि पूंछ भागात पाकिस्तानने कुरापती केल्या होत्या. त्यास वेळोवेळी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बारामुला व शोपिया जिल्ह्यांत वेगवेगळ्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी तसेच जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या दहशतलवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे.
  Print


News - World | Posted : 2019-12-25


Related Photos