आमच्या कुटुंब प्रमुखांना सोडा - साखेरा टोला गावातील महिलांचा एकच टाहो


- आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली गावाला भेट

- साखेरा टोला येथील पोलिसांच्या कारवाईचा निषेध, अन्याय दूर करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कारवाफा नजीकच्या साखेरा टोला येथील कोंबडा बाजारात येवून पोलिसांनी गावातील लोकांना अटक केली आहे. यामध्ये अनेक कुटुंब प्रमुख पोलिसांच्या अटकेत असल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट निर्माण झाले असून गावातील नागरिक दहशतीखाली जगत आहेत. याकडे गांभिर्याने लक्ष देवून आमच्या कुटुंब प्रमुखांना तत्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी साखेरा टोला येथील महिलांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे. यावेळी गावातील महिलांनी पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला असून आम्हाला न्याय मिळवून द्यावा व पोलिसांची दडपशाही थांबविण्यात यावी, अशी मागणीही महिलांनी आमदार डाॅ. होळी यांच्याकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार होळी साखेरा टोला गावाला भेट दिली असता महिलांनी पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबाबत आपली कैफियत मांडली.
धानोरा तालुक्यातील कारवाफा जवळील साखेरा टोला येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर नुकतेच पोलिसांनी सध्या पोशाखात धाड टाकली व या धाडीत साखेरा टोला अनेक लोकांना अटक केली. यात अनेक निरपराध लोकांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये त्या दिवशी कोंबडा बाजाराला न गेलेल्या काही लोकांना घरून उचलून पोलीस स्टेशन येथे नेऊन गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. या धाडसत्रात कोंबडा बाजारात चने फुटाणे दुकान लाऊन रोजीरोटीकरिता गेलेल्या सामान्य नागरिकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. साखेरा टोला ही जेमतेम ४८ घरांची लोकवस्ती असलेला छोटा गाव आहे. यापैकी ३० ते ३५ पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी लगेच साखेरा टोला या गावाला भेट दिली व गावातील महिला भगिनी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महिलांनी आपली कैफियत मांडली. तेव्हा बोलताना महिला भगिनी यांनी सांगितले की, आज गावातील पुरुष मंडळी अटकेत असल्याने कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. पोलिसांकडून गावातील लोकांना घरून नेवून अटक करण्याच्या कारणामुळे काही पुरुष मंडळी गावातून पलायन केले आहे. सदर कोंबडा बाजार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होता. गावात नक्षल जनजागरण मेळावा आयोजित करण्यास मदत केल्यास कोंबडा बाजार भरवण्यास परवानगी देण्यात येईल, असे आमिष पोलिसांनी दाखवून आमच्याकडून जनजागरण मेळावा करवून घेतला. त्यानंतर या कोंबडा बाजारात सिव्हील ड्रेसवर येऊन उपस्थित सर्वांना अमानुषपणे मारहाण केली व सर्वांकडे असलेले कोंबडे व पैसा जप्त करण्यात आला. याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांना माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी गावातील महिलांनी केली आहे. या सर्व विषयांची आमदार डॉ. देवराव होळी यांनी माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आदिवासी नागरिकांना सोडण्याची मागणी केली. साखेरा टोला येथील लोकांना अमानुषपणे मारहाण करून गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करून गावात उपस्थित लोकांना पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-25


Related Photos