महाराष्ट्राला चार आकाशवाणी पुरस्कार : पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग देशात सर्वोत्कृष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज आकाशवाणीच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाच्या पुरस्कारासह महाराष्ट्राला एकूण चार आकाशवाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर आकाशवाणीच्या अभियांत्रिकी कार्य आणि पुणे आकाशवाणीच्या महिला विषयक कार्यक्रमाने पुरस्कार पटकाविला. तर मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती सेवेतील उद्घोषकाला सर्वोत्तम उद्घोषकाचा बहुमान मिळाला आहे.
येथील आकाशवाणी भवनाच्या सभागृहात आज ‘वर्ष २०१६ आणि २०१७ च्या आकाशवाणी पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. प्रसार भारतीचे अध्यक्ष एस.सुर्यप्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी शशी एस. व्येंपट्टी आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ. शेहरयार यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी देशातील आकाशवाणी केंद्राना विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

पुणे आकाशवाणी केंद्राच्या तंत्रज्ञान कुशल वापराची दखल

नवीनतम तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करणाऱ्या पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागाच्या पुरस्काराने (वर्ष २०१७ ) सन्मानित करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे प्रमुख तथा उपसंचालक नितीन केळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील पहिले पेपरलेस प्रादेशिक वृत्त विभाग होण्याचा मान या केंद्राने मिळविला आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करून बातम्या अधिकाधिक चांगल्या करण्याबरोबरच नव-नवीन गॅझेट्सच्या माध्यमांतून या बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात या केंद्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
अभियांत्रिकी श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार (२०१६) आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या तत्कालीन अभियंत्या शुभा धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर आकाशवाणीमध्ये डिजिटायजेशनसह कंसोल आणि  मिक्सर इंन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर नेटवर्कींग आणि ॲडमिनीस्ट्रेशनमध्ये  केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे आकाशवाणीच्या ‘ओ वुमनिया’ कार्यक्रमाला महिलांसाठीच्या सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा पुरस्कार (वर्ष २०१७) प्रदान करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी तेजश्री कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘ओ वुमनिया’ कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतागृह विषयक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात आली आहे. 
आकाशवाणीने प्रथमच सर्वोत्कृष्ट उद्घोषकाचा पुरस्कार सुरु केला असून या पुरस्काराने (वर्ष २०१७ )  मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या उद्घोषक ममता सिंह यांना सन्मानित करण्यात आले.
  Print


News - World | Posted : 2019-12-25


Related Photos