स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी एटापल्लीत केली वीज बिलांची होळी


- एक दिवसीय उपोषण व आत्मक्लेश आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका शाखा एटापल्लीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्य व अेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी मंगळवार, २४ डिसेंबर २०१९ रोजी एटापल्ली येथे वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच एक दिवसीय उपोषण व आत्मक्लेश आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यात आले. यासंदर्भात तहसीलदार एटापल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्य तसेच अहेरी व अन्य नवीन जिल्ह्याच्या निर्मितीशिवाय सर्वांगीण विकास होणार नाही. विदर्भाला न्याय मिळणार नाही. याबाबत काॅंग्रेस व भाजपा यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी याआधी याबाबत विविध ठराव केले होते. सत्तेत आल्यानंतर जनतेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून जनतेला विकासापासून दूर ठेवले. शासन व प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या नेतृत्वात जनतेने अनेकदा सत्याग्रह केले व निवेदन सादर केले. परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे जनतेला पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागला. स्वातंत्रयानंतरही विदर्भातील जनता मुलभूत व भौतिक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी आंदोलन करण्यात आले व निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्वतंत्र विदर्भ राज्याची युद्धपातळीवर निर्मिती करून विनाविलंब घोषित करावे, वीज बिलातील सर्व कर, अधिमार रद्द करून अन्यायग्रस्त वाढीव वीज बिल निम्मे कमी करावे, जारावंडी व अन्य नवीन तालुक्यासह अहेरी जिल्ह्याची विनाविलंब निर्मिती करून घोषित करावे, आलापल्ली-एटापल्ली-दिंडवीसह तालुक्यातील सर्व रस्ते व पुलाची दुरूस्ती करावी, नवीन रस्त्ते व पुलाचे बांधकाम करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती दक्षिण गडचिरोलीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे, तालुका अध्यक्ष नीलेश पुल्लूरवार, उपाध्यक्ष प्रमोद देवतळे, सहसचिव राकेश तेलकुंटलवार, सचिन मोतकुरवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-24


Related Photos