अडीच लाखांची लाच मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाच पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात


- नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
एका गुन्ह्यातील तक्रारदारास सहआरोपी न करण्यासाठी २ लाख रुपये आणि सापळ्याच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचा पोलिस कोठडी रिमांड न वाढविण्यासाठी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील पोलिस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार ह्या हाॅटेल हॅरिटेज नागपूर येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध लाचेच्या सापळ्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस निरीक्षक पंकज उकंडे याच्याकडे होता. त्या गुन्ह्यामध्ये यातील तक्रारदारास सहआरोपी न करण्यासाठी आरोपी उकंडे याने  २ लाख रुपये आणि सापळ्याच्या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या आरोपीचा पोलिस कोठडी रिमांड न वाढविण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. फिर्यादीचा नमूद सापळा प्रकरणात कोणताही संबंध नसताना त्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी आणि त्याच्याविरुद्ध विभागीय कार्यवाहीचा प्रस्ताव सुद्धा न पाठविण्यासाठी आरोपी पोलिस निरीक्षक उकंडे याने लाचेची मागणी केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयास सादर करण्यात आला होता.
सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक मुख्यालय मुंबई यांचे २३ डिसेंबर २०१९ च्या निर्देशानुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीच्या त्रिमूर्तीनगर रिंग रोड नागपूर येथील राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. आरोपी उकंडे अद्यापपर्यंत सापडला नसल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक मिलिंद तोंतरे, नाईक पोलिस शिपाई गजानन गाडगे, मनोज कारनकर, चालक पोलिस शिपाई विकास गडेलवार यांनी केली आहे. या कारवाईमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सुद्धा लाचखोर असल्याची बाब पुढे आली आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-12-24


Related Photos