गोंदिया जिल्हा परिषदेत कार्यरत उपअभियंता एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसा, ककोडी व भानपूर येथील नवनिर्माण इमारतीमधील झालेल्या विद्युतीकरणाचे कामाचे मोजमाप करून झालेल्या कामाचे चालू देयके वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याकरिता चालू देयकाचे ५ टक्के प्रमाणे १ लाख ७० हजार रु. लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून पहिला हफ्ता म्हणून १ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारतांना जिल्हा परिषद, गोंदिया, पायाभूत सुविधा विकास कक्षातील उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे . सुनील चिंतामण तरोणे  (३९) असे लाचखोर उप अभियंत्याचे नाव आहे . 
तक्रारदार हे विद्युत कंत्राटदार असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गोंदियाया जिल्ह्यातील भानपूर, दर्रेकसा, ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वेअर हाऊस बिल्डिंग, डीपीएमयू युनिट, जि.प. गोंदिया या इमारतीमध्ये विद्युतीकरणाचे काम करण्याचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. त्यानुसार तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्रेकसा व ककोडी येथील इमारतीमधील विद्युतीकरणाचे काम विहित मुदतीत जवळपास पूर्ण केले आहे. त्यामुळे देयकासंबंधाने चर्चा करण्याकरिता तक्रारदार सुनील चिंतामण तरोणे यांना भेटले असता, त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसा, ककोडी व भानपूर येथील नवनिर्माण इमारतीमधील झालेल्या विद्युतीकरणाचे कामाचे मोजमाप करून झालेल्या कामाचे चालू देयके वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याकरिता चालू देयकाचे ५ टक्के प्रमाणे १ लाख ७० हजार रु. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची सुनील चिंतामण तरोणे यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदविली. 
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान सुनील तरोणे यांनी वरील कामाकरिता तक्रारदाराकडून १ लाख ७० हजार रु. लाचेची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून १ लाख रु. लाच रक्कम स्वीकारली. त्यावरून आरोपी विरुद्ध १८ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे ७ (अ) लाच लुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे. 
सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर पोलीस उपयुक्त / पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या  मार्गदर्शनात पोलीस उपधीक्षक रमाकांत कोकाटे,स. फौ. दिवाकर भदाडे, पो.हवा. राजेश शेंद्रे, प्रदीप तुळसकर, ना.पो. शी. रंजित बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, महिला पोलीस वंदना बिसेन, चा.ना.पो.शी. देवानंद मारबते सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. 
अँटी करप्शन ब्युरो तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो, कार्यालयाशी संपर्क साधावा. 

   Print


News - Gondia | Posted : 2018-09-18


Related Photos