३ जानेवारीला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक


- अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी समीकरणांची जुळवाजुळव सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारी २०२० रोजी घेण्याचे निश्चित झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत शनिवार, २१ डिसेंबर २०१९ रोजी आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची खुर्ची मिळविण्यासाठी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
ग्रामविकास विभागाच्या १० डिसेंबर २०१९ च्या पत्रानुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक पत्र जारी केले असून, ३ जानेवारी २०२० ला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी विशेष सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात ही विशेष सभा होणार असून, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) धनाजी पाटील यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी सप्टेंबर २०१९ मध्येच संपला. परंतु त्यापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक व नंतर झालेली विधानसभा निवडणूक यांच्या आचारसंहितेत तीन महिने गेल्याने जिल्हा परिषदांना विकासकामे करताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालिन सरकारने जिल्हा परिषदांना १२० दिवसांची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ २० जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वीच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपदांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारीला होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत सद्य:स्थितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आविसं यांची सत्ता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय समाज पक्ष २ व ग्रामसभांचे २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचा अध्यक्ष व दोन सभापती, आविसंचा उपाध्यक्ष व एक सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती विराजमान आहे. मात्र राज्यात झालेले सत्तांतर लक्षात घेता यावेळेस कोणत्या पक्षाची सत्ता बसते व कोणत्या पक्षाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष बनतो याकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-21


Related Photos