राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अजब विधान : संस्कृत श्लोक लोकांना बलात्कारापासून परावृत्त करतात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
'विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे महिलांवर होणारे बलात्कार रोखता येतील' असं अजब विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज ॲडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, हे लोक ज्ञानाचा वापर आणि गैरवापर कसा करतात, सत्ता आणि पैसा याचा वापर कसा होतो अशा अनेक विषयांवर ते बोलले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशातील महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांचा विषयही काढला. आपल्या भाषणात त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार कसे थांबवता येतील याविषयी आपलं मत मांडलं.
'एक काळ असा होता ज्यावेळी घरोघरी कन्यापूजा केली जायची. परंतु, आज देशात काय घडतंय? 'दुष्ट' शक्ती देशात महिलांवर बलात्कार करत आहेत, अत्याचार करत आहेत. सत्तेचा, शक्तीचा वापर हा गैरवापर करण्यासाठी असतो की सरंक्षण करण्यासाठी? त्यामुळे, विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा...संस्कृत श्लोकांमुळे मन बलात्कारासारख्या विचारांपासून परावृत्त होते. त्यामुळे बलात्कार रोखता येतील ' असं कोश्यारी म्हणाले.
बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांची मदत केली. या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बजाज कुटुंबीयांची तुलना संतांशी केली. 'आपला समाज घडवायला संतांचं योगदान मोलाचं आहे. या योगदानाची तुलना ज्याप्रमाणे इतर कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. बजाज कुटुंबीयांसारखे उद्योजक संतांप्रमाणे आहेत. जेव्हा उद्योजक अशा संतप्रवृत्तीचे असतात त्यावेळी अनेक गरजूंना मदत होते.' असं ते म्हणाले.
  Print


News - Rajy | Posted : 2019-12-20


Related Photos