गडचिरोली शहर वासियांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी नगराध्यक्षा योगिता पिपरे व उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर तत्पर


- सिमेंट रस्ते, नाल्यांचे बांधकाम व शहरातील स्वच्छतेसाठी प्रयत्नशील

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे व उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी पुढाकार घेतला आहे. गडचिरोली शहर वासियांच्या समस्या व अडीअडचणी तत्काळ सोडविण्यासाठी ते तत्पर असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याची असो की, कचरा उचलण्याबाबतची नागरिकांची तक्रार आल्यास तत्काळ दखल घेऊन जनतेची अडचण दूर करण्यात येत असते. रुग्णवाहिका व अग्नीशमन दलास पाचारण केल्यास त्या ठिकाणी विनाविलंब पाठवून जनतेचे समाधान करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा, उपाध्यक्ष यांच्यासह सभापती व नगरसेवकांकडून होत आहे.
नगराध्यक्षा, उपाध्यक्ष यांच्या पुढाकारातून आणि सभापती व नगरसेवकांच्या सहकार्यातून मागील तीन वर्षांपासून गडचिरोली शहरात विकासाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नगराध्यक्षा योगिता पिपरे व उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी पदाचे सूत्रे हाती घेताच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून विकास आराखडा तयार केला व विकास कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत शहरात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. नगरोत्थान, दलितवस्ती व वैशिष्टयपूर्ण या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून शहरात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. गडचिरोली शहरातील प्रत्येक वाॅर्डामध्ये सिमेंट -काॅंक्रीटचे रस्ते, नाल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आहेत. याशिवाय अनेक कुटुंबाना शौचालय मंजूर करण्यात आले आहेत. स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याच्या दृष्टीने त्यांचा कसोसीने प्रयत्न सुरू आहे. शहरातील ओला व सुका कचरा उचलून त्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. शिवाय शहरातील कचराकुंड्यामधील कचरा सुद्धा वेळीच उचलण्यात येत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती घडविण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक दुकानात जमा होणारा कचरा उचलण्याकरिता शहरातील अनेक मार्गावरून दिवसभर नियमितपणे घंटागाड्या फिरविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक व दुकानदारांना सुद्धा स्वच्छतेची सवय लागली असल्याने या घंटागाड्यांमध्ये टाकण्यात येत आहे. नगराध्यक्षा योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगर परिषदेचे सर्व सभापती व नगरसेवक यांच्या सहकार्याने शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणावर शासनाकडून निधी खेचून आणण्यात येत आहे. मागील कालावधीत शहरातील भूमिगत गटारलाईनच्या कामाकरिता ९५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करवून आणण्यात आला आहे. शहरातील वाढीव पाईपलाईनच्या कामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच फिल्टर प्लाॅन्ट येथे पाण्याची टाकी मंजूर करण्यात असून विसापूर येथेही पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील जनतेला नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
गडचिरोली शहराच्या विकास कार्यात आणखी भर पडण्यासाठी आणि नागरिकांना रहदारीच्या दृष्टीने सोयीस्कर होण्याकरिता आऊटर रिंगरोडचे काम तातडीने सुरू होण्याची जनतेला अपेक्षा आहे. जिल्हृयाचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात अनेकदा वाहतुकींची कोंडी होत असते. जड व हलक्या वाहतुकीकरिता एकच मार्ग असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यादृष्टीने आऊटर रिंगरोड होणे आवश्यक आहे. तसेच गडचिरोली शहरातील चामोर्शी, आरमोरी, मूल, धानोराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या गडचिरोली -धानोरा व गडचिरोली -मूल राष्ट्रीय महार्गावर चौपदरी सिमेंट-काॅंक्रीटचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले असल्याने वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने ते काम तातडीने पूर्णत्वास येण्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच शहरातील चामोर्शी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची अपेक्षाही शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भूमिगत गटार लाईनसाठी शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्ते फोडण्यात आले असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सुद्धा गांभिर्याने लक्ष देवून अंतर्गत सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशीही अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-18


Related Photos