भद्रावती येथील उपकोषागार अधिकारी मोहन काळे अडकला एसीबीच्या जाळ्यात


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी (वर्ग ३) मोहन देवीदास काळे (४३) यास ३ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार, १८ डिसेंबर २०१९ रोजी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार हे भद्रावती येथील रहिवासी असून तक्रारदाराचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची म्हणजे पळसगाव ढाळीच्या बांधकामाचे ६ लाख ८ हजार ६११ रुपये व चैरादेवी मजगी पुनर्जीवन कामाचे १ लाख ३७ हजार ३७८ रुपये रक्कमेच्या देयकांवर आक्षेप न नोंदविता उपकोषागार कार्यालयातून मंजूर करण्याकरिता उपकोषागार अधिकारी मोहन देवीदास काळे यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने गोपनीयरित्या शहानिशा करून उपकोषागार अधिकारी कार्यालय भद्रावती येथील उपकोषागार अधिकारी याच्याविरुद्ध सापळा रचला. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिस स्टेशन भद्रावती येथे काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर, नाईक पोलिस काॅन्स्टेबल संतोष येलपूलवार, पोलिस काॅन्स्टेबल संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे, चालक राहूल ठाकरे यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-12-18