अंकिसा येथील विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यासह एक खाजगी इसम अडकला एसीबीच्या जाळ्यात


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सिरोंचा तालुक्यातील अंकिसा केंद्रातील कनिष्ठ अभियंता पंकज अशोक अटमकवार (३२) व खाजगी इसम प्रकाश बालया येरोला (३८) ता. सिरोंचा, जि. गडचिरोली अशा दोन जणांना ८ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार, १८ डिसेंबर २०१९ रोजी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार हा आसरअल्ली, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे. तक्रारदाराने घराच्या बोरवेलमधून पाणी घेण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटरचे कनेक्शन मीटरमधून घेतले आहे. त्याबाबत कनिष्ठ अभियंता पंकज अशोक अटकमवार याने तक्रारदाराचे मीटरमधून वीज चोरीचा गुन्हा नोंद न करण्याकरिता तसेच कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याकरिता १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदारास अटकमवार यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक यशवंत राउत यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून १८ डिसेंबर २०१९ रोजी पंकज अशोक अटकमवार व खाजगी इसम प्रकाश बालया येरोला यांच्याविरुद्ध सापळा रचला. त्यात कनिष्ठ अभियंता पंकज अटमकवार याने तक्रारदारावर वीज चोरीचा गुन्हा नोंद न करण्याकरिता तसेच कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याकरिता १० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपयांची लाच रक्कम खाजगी इसम प्रकाश येरोला याच्या हस्ते स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले. त्या दोघांविरुद्ध पोलिस स्टेशन सिरोंचा येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, यशवंत राउत, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, नाईक पोलिस शिपाई सतीश कत्तीवार, पोलिस शिपाई देवेंद्र लोनबले, चालक पोलिस शिपाई घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-18


Related Photos