सूरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला चालना द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश


-  विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनांवरही तातडीने कार्यवाही होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकास कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार, १७ डिसेंबर २०१९ येथे दिले. या बैठकीस उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सुचनाही ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन ठाकरे हे आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा मंगळवारी आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, रामदास आंबटकर, कृष्णा गजभिये तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहे. लगतच्या तेलंगाना राज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा, अशा सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचना
या आढावा बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे ही आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सूरजागड लोह उत्खनन प्रकल्प, धान खरेदी,  मेडीगट्टा बॅरेज या विषयावर शासनाला सुचना केल्या. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबत सद्यस्थिती बैठकीत सांगितली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-12-18


Related Photos