अहेरी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या प्रोटोकाॅलचे उल्लंघन


- जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

- पदाधिकाऱ्यांना मान न देता व्यासपीठावर बसविले खाजगी व्यक्तींना

- शासकीय कार्यक्रमाला दिले खाजगी स्वरुप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी येथील पंचायत समिती कार्यालयात १३ डिसेंबर रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना फारसे मान न देता त्यांच्या प्रोटोकाॅलचे उल्लंघन करण्यात आले. या आढावा बैठकीच्या व्यासपीठावर खाजगी व्यक्तींना बसण्याचा मान देवून अधिकृतरित्या पदावर असलेल्या व्यक्तींना विलंबाने बैठकीला उपस्थित झाल्याची सबब पुढे करत त्यांच्या प्रोटोकाॅलचे उल्लंघन करण्यात आले आहे. अहेरी पंचायत समितीची आढावा बैठक हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा या बैठकीला खाजगी कार्यक्रमाचे स्वरुप देण्यात आल्याचा खळबळजनक व संतापजनक प्रकार घडला आहे. याबद्दल गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम व इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम -उमानूर केंद्राचे केंद्रस्तरीय बालक्रीडा संमेलन १३ डिसेंबर २०१९ रोजी जोगनगुडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनीस सोहळ्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मान्यवर म्हणून गेले होते. त्या कार्यक्रमावरून ते पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित झाले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा प्रोटोकाॅल लक्षात घेवून त्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान आयोजकांच्यावतीने देणे आवश्यक होते. मात्र आढावा बैठकीला बऱ्याच विलंबाने उपस्थित झाल्याचे कारण पुढे करीत त्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरील नियोजित ठिकाणी स्थानापन्न करण्यात आले नसून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे अजय कंकडालवार व इतर पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अधिकृतरित्या प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोटोकाॅलनुसार आढावा बैठकीच्या व्यासपीठावर स्थानापन्न करणे आवश्यक असताना मात्र त्याकडे हेतूपुरस्सररित्या दुर्लक्ष करीत पदाधिकाऱ्यांच्या प्रोटोकाॅलचे उल्लंघन करण्यात आले. दुसरीकडे कोणत्याही शासकीय पदावर नसलेल्या खाजगी व्यक्तीला आढावा बैठकीच्या व्यासपीठावर बसवून एकप्रकारे शासकीय कार्यक्रमाला खाजगी कार्यक्रमाचे स्वरुप देण्यात आल्याचे चित्र शुक्रवारी अहेरी पंचायत समितीच्या आढावा बैठकीतून दिसून आले. असाच प्रकार अहेरी विभागातील पाचही तालुक्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम यांच्यासह काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-15


Related Photos