भिवापूर येथील दोन कंत्राटी लाईनमन ३ हजारांची लाच घेताना अडकले एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही सबस्टेशन भिवापूर, जि. नागपूर येथील कंत्राटी लाईनमन प्रितम गौतम लोखंडे (25) व शुभम पुंडलिक हिंगे (25) यांना ३ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार विरखंडी धार्पला ता, भिवापूर, जि. नागपूर येथील रहिवासी असून ते शेतीचे काम करतात. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने धार्पला येथे दोन एकर शेती आहे. शेतामध्ये विहिर असून पिकांना पाणी देण्याकरिता विद्युत मीटर लावण्याकरिता तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भिवापूर येथे अर्ज करून त्यासाठी लागणारे डिमांड ५ हजार ७४८ रुपये भरले आहेत. पैसे भरल्यावर सुद्धा तक्रारदाराच्या शेतात मिटर लावण्यात आले नाही. त्यामुळे तक्रादारास पोलच्या तारावर आकोडा टाकून विहिरीवरील मोटार चालवण्याकरिता कारवाई न करण्याकरिता कंत्राटी लाईनमन प्रितम गौतम लोखंडे व शुभम पुंडलिक हिंगे यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लोखंडे व हिंगे यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील अधिकारयांना भेटून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस निरीक्षक विनोद आडे यांनी गोपनीयरित्या शहानिशा करून १४ डिसेंबर २०१९ रोजी प्रितम गौतम लोखंडे व शुभम पुंडलिक हिंग यांच्याविरुद्ध योजनाबद्धरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यात प्रितम लोखंडे व शुभम हिंगे यांनी तक्रारदारास पोलच्या तारावर आकोडा टाकून विहिरीवरील मोटार चालविण्याकरिता कारवाई न करण्यासाठी ४ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने प्रितम लोखंडे व शुभम हिंगे यांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन भिवापूर येथे गुनहा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत नागपूर विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीथ्क विनोद आडे, पोलिस हवालदार अशोक बैस, नाईक पोलिस शिपाई अनिल बहिरे, महिला पोलिस शिपाई वंदना नगराळे, चालक पोलिस हवालदार शारीक शेख यांनी केली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-12-15


Related Photos