महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने नावाची नोंदणी करणे आवश्यक


- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची माहिती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी शिक्षक मतदार यादीमध्ये नाव असले तरी पात्र शिक्षकाने नमुना – 19 मध्ये आपले नाव नव्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक मतदार यादी नोंदणी संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. शिक्षक मतदार संघाकरीता विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून सर्व जिल्हाधिकारी व सर्व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच जिल्ह्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद / पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी नमुना – 19 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पात्र शिक्षक हा भारताचा नागरीक असावा. राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकापुर्वीच्या लगतच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल. पात्र शिक्षकांचा अध्यापनाचा कालावधी सलग किंवा ब्रेकमध्ये तीन वर्षे पूर्ण असावा. नाव नोंदविण्यासाठी पात्र व्यक्तिंनी दावा अर्ज नमुना – 19 मध्ये रंगीत छायाचित्र व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत परिशिष्ट – 2 मधील संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.

माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये पूर्णवेळ कार्यरत शिक्षक सदर निवडणुकीसाठी नाव नोंदविण्यास पात्र असून पार्ट टाईम शिक्षक पात्र नाही. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक पात्र शिक्षकांना ऑफलाईन पध्दतीने नमुना – 19 मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

शिक्षक मतदार नोंदणीसाठी एकूण 9 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असून 27 पदनिर्देशित अधिकारी आहेत. शिक्षक मतदार यादी नोंदणीकरीता जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी नव्याने आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.  

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे, नायब तहसीलदार गभणे उपस्थित होते.


असा आहे मतदार यादी नोंदणी कार्यक्रम : मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा 1 ऑक्टोबर 2022, वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2022, वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2022, नमुना – 19 द्वारे  दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम 7 नोव्हेंबर 2022, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 19 नोव्हेंबर 2022, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 23 नोव्हेंबर 2022, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022, दावे व हरकती निकाली काढण्याचा व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबर आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा 30 डिसेंबर 2022 आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos