आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काल  १० डिसेंबर रोजी मुंबई येथील विधानभवनात विधानसभा अध्‍यक्ष नाना पटोले यांच्‍यासमक्ष आमदार म्‍हणून शपथ घेतली. राज्यात ठाकरे सरकारचा शपथविधी, त्यानंतर बहुमताचा ठराव आणि त्यानंतर नवीन आमदारांचा शपथविधी या सर्व घडामोडी घडत असताना आमदार सुधीर मुनगंटीवार त्यांच्या लेकीच्या विवाह सोहळ्यात व्यस्त होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मुलीचा विवाह सोहळा १ डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्‍न झाला. त्‍यामुळे ते सभागृहात शपथ घेऊ शकले नाहीत. त्‍यांनी आज विधानसभा अध्‍यक्षांसमक्ष विधानसभा सदस्‍य म्‍हणून शपथ घेतली आहे.
सुधीर मुनगंटीवार हे गेली सहा टर्म सलग विधानसभा सदस्‍य आहेत. १९९५ साली ते प्रथम विधानसभेचे सदस्‍य झाले. १९९५, १९९९, २००४ या तीन टर्ममध्‍ये ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे सदस्‍य होते. २००९ मध्‍ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्‍यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली व विजयी झाले.
२००९, २०१४ आणि आता २०१९ अशी सलग तीन वर्षे ते बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातून विजयी झाले. १९९९ मध्‍ये ते काही महिने पर्यटन व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री होते. तर गेली पाच वर्षे अर्थ, नियोजन व वन खात्‍याचे मंत्री म्‍हणून त्‍यांनी जबाबदारी सांभाळली. वनमंत्री म्‍हणून तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्‍याचा त्‍यांनी केलेला संकल्‍प पूर्ण करण्‍यात आला. अर्थमंत्री म्‍हणून राज्‍याच्‍या विकासाला दिशा देणारे उत्‍तम अर्थसंकल्‍प त्‍यांनी मांडले. अनेक प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांचे ते मानकरी ठरले. नुकताच फेम इंडिया या नियतकालिकाच्‍या माध्‍यमातून त्‍यांना देशातील सर्वश्रेष्‍ठ अनुभवी मंत्री म्‍हणून रविण्‍यात आले.
राज्‍यातील दीन, दुर्बल, शोषित, पीडित, उपेक्षित, वंचितांच्‍या आयुष्‍यात विकासाचा प्रकाश निर्माण व्‍हावा यासाठी आपण विधानसभेच्‍या माध्‍यमातून संघर्ष करू व राज्‍याच्या विकासात योगदान देऊ, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या शपथग्रहणावेळी भाजपचे महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, आशिष शेलार , विजय वडेट्टीवार, भाई गिरकर, सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.
  Print


News - Rajy | Posted : 2019-12-11


Related Photos