‘दिंडवी ’ येथे प्रथमच पोहचली सिंचनाची गंगा


- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या वतीने ८ शेततळ्यांची कामे पुर्ण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास नावापुरताच आहे. शासकीय योजना अद्यापही पोहचलेल्या नाही. तालुक्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही. केवळ निसर्गाच्या बळावर शेती केली जाते. ‘पिकली तर शेती, नाहीतर माती’  अशी अवस्था तालुक्यातील शेती व्यवसायाची आहे. मात्र या तालुक्यात आता व्हीएसटीफच्या पुढाकाराने शेततळे योजना पोहचली असून तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या ‘दिंडवी ’गावात  शेततळयाची ८ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या गावात प्रथमच सिंचनाची ‘गंगा’ पोहचली आहे.  त्यामुळे शेतकNयांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.
 राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त ‘दिंडवी’ गावाचा समावेश आहे. दिंडवी ग्रामपंचायत अंतर्गत ५ महसूली गावांचा समावेश आहे. या महसूली गावात जवळपास ४५० घरांची वस्ती असून लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे. दिंडवी गावात  विविध समस्या आहेत. गावात रस्ते, नाल्या, भ्रमनध्वनी, पाणी, आरोग्य, शिक्षण  सिंचनाच्या समस्या आहेत.
गावालगत छोटी नदी असून या नदीवर बंधारे नसल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी वाहून जाते. तर उन्हाळ्यात नदी पाणीच नसते. त्यामुळे गावलगत असलेल्या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. निसर्गाच्या कृपेवरच  येथील शेतकरी केवळ खरीप हंगामात शेती करतात.
गावातील सिंचनाची समस्या लक्षात घेऊन ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून  सन २०१८-२० या आर्थिक वर्षात ८ शेततळ्यांची कामे मंजूर करण्यात आली आणि ही आठही कामे तातडीने पुर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होण्याबरोबरच गावातील जनावरे व पशुपक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.  दिंडवी गावात नितेश लकडे हे ग्रामपरिवर्तक म्हणून काम करीत असून  त्यांनी गावकरी व ग्रामपंचायत प्रशासनाच्या समन्वयातून गावात शेततळे योजना अंमलात आणली. यासाठी जिल्हाधिकारी शेखर,  सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, व्हीएसटीएफचे अधिकारी श्रीकांत राठोड यांच्या मार्गदर्शनात  दिंडवी गावात शेततळे व इतर विकासात्मक कामाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-10


Related Photos