जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस आजीवन कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा


- जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस आजीवन कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी सोमवार, ९ डिसेंबर २०१९ रोजी ठोठावली आहे. बाबुलाल चमरू नैताम (५०) रा. टाहकाटोला, ता. कोरची, जि. गडचिरोली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, १९ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आरोपी बाबुलाल चमरू नैताम हा मृतक दारसू देवसाय पुडो याला टक्कर झाली असता आरोपीच्या हाताला रक्त लागल्याने आरोपीने मनात राग धरून स्वतःजवळील कुरहाडीने मागच्या बाजुने मृतक दारसू देवसाय पुडो (३५) रा. टाहकाटोला, ता. कोरची, जि. गडचिरोली याच्या डोक्याच्या मागील बाजूस जोराने वार केला. यात तो खाली पडला असता त्याच्यावर वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यु झाला. यावेळी अंधार झाल्याने मृतदेहाला शेतातील विहिरीजवळ जांबाच्या झाडाला त्याच्याच लुंगीने गळफास लावून लटकावून ठेवला. रात्री मृतक घरी न आल्याने त्याच्या पत्नीने २९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ७ वाजता मुलासोबत आजुबाजुच्या परिसरात शोध घेत असताना त्यांच्या शेतातील विहिरीजवळ जांबाच्या झाडाला तिचे पती मृतक दारसू पुडा हे गळफास घेवून मृतावस्थेत आढळून आले. त्यास जवळ जावून बघितले असता त्याच्या डोक्याला मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने मारल्याचा निशाणा दिसला व रक्त खाली सांडत होते. या प्रकरणी आरोपी बाबुलाल नैताम याच्यावर संशय घेवून त्याच्याविरुद्ध पोलिस मदत केंद्र बेडगाव येथे तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिस स्टेशन कोरची येथे अपराध क्रमांक ३६/२०१६ कलम ३०२ भादंविच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने ९ डिसेंबर २०१९ रोजी आरोपीस प्रमुख व सत्र न्यायाधीश यांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी काम पाहिले. तसेच गुन्हृयाचा तपास पोलिस मदत केंद्र बेडगावचे पोलिस उपनिरीक्षक शेखर शब्बीर खाॅ तडवी यांनी केले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी कामकाज पाहिले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-09


Related Photos