चला स्क्रब टायफसशी सामना करु या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
पावसाळा सुरु झाला की, वातावरणात संमिश्र बदल होतात. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अन्न पदार्थावर बुरशी येणे, नवीन जीवजंतूंची वाढ होणे, पावसाळ्यात पूर परिस्थिती उदभवल्याने कधीकधी पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्या जाणे या व अशा सारख्या बाबींमुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला आजाराची लागत मोठ्या प्रमाणात होते.  नविन जिवाणूजन्य आजार पसरतात. त्यातच आता नागपुरात स्क्रब टायफस नावाचा आजार आढळत आहे. यामध्ये नागरिकांमधून स्क्रब टायफसवरुन भितीचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र उपचारापेक्षा कायम प्रतिबंध बरा.   

स्क्रब टायफस का होतो


स्क्रब टायफस हा जीवाणूजन्य आजार आहे. ओरिएन्शिया सुसुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर पण अपचाराने बरा होणारा असा  हा आजार आहे.  जीवाणूत हा आजार होतो. त्यामुळे जीवाणू हा त्याचा वाहक मानला जातो. ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे ज्याला चिगर म्हणतात, ते चावल्यामुळे ओरिएन्टा सुसुगामुशी हे जंतु मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जिथे झाडीझुडप किंवा गवत असते, त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ते माणसाला चावतात. मानव हे या माइटचे आकस्मिक पाहूणे असतात. चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून आजार पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते.

कसा पसरतो जीवाणू?

चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी आजाराची लक्षणे दिसायला लागतात. चिगर लारव्हे साधारण 0.2 ते 0.4 मिलीमीटर आकाराचे असे अतिशय सुक्ष्म असतात. त्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखतही नाही. त्यामुळे  काही चावल्याचे भान राहत नाही. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षणे असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषज्वर किंवा डेंग्यु असण्याची शक्यता वर्तविली जाते.

परिणाम काय होतो ?

स्क्रब टायफसमुळे मानवी शरीरावर होणारे निश्चित असे परिणाम नाहीत. साधारण 50 टक्के रुग्णांना लिव्हरचा त्रास आणि न्युमोनिया होतो. त्यामुळे काविळ आणि श्वासाचा त्रास होतो. तर 35 टक्के रुग्णांना एआरडीएस होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. 30 टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळेवर योग्य उपचार झाला नाही तर 50 टक्के रुग्ण दगावतात. 25 टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो.

इतर लक्षणे

ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, किडा चावलेल्या ठिकाणी व्रण दिसतो, मळमळ व ओकाऱ्या येणे, शुद्ध हरपणे, चालताना तोल जाणे. यापैकी ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे ही कारणे साधारणता आपण फारशी गांभिर्याने घेत नाही. मात्र आरोग्य विषयक जागृत राहून वरील लक्षणे आढळल्या तात्काळ जवळच्या शासकीय रुगणालयात संपर्क करावा.

काय आहेत उपचार?

स्क्रब टायफस या आजारावरील उपचार तुलणेने स्वस्त आहेत. तापेच्या औषधांनीही तो बरा होऊ शकतो. विशेषत: डॉक्सिसायक्लीन वा टिट्रासायक्लीन नावाचे इंजेक्शन व गोळ्यांच्या आधारेही त्यावर नियंत्रण मिळविता येते. विशेष म्हणजे ही औषधे जेमतेम शंभर रुपयांच्या आत मिळतात. त्यामुळे घाबरण्याचे अजिबात कारण नाही. स्क्रब टायफस बाबतीत गवत, झाडे झुडपे यांच्या संपर्कात जास्त काळ राहिल्यास पूर्ण कपडे घालूनच राहावे, फिरुन
आल्यावर गरम पाण्याने स्वच्छ हातपाय धुवावे, पावसाळ्यामुळे ओलसर राहणारे भिंतीवर जास्त दिवस राहणारे कपडे गरम पाण्याने धुवून काढावे.

- के. के. गजभिये  Print


News - Gondia | Posted : 2018-09-17


Related Photos