मुंबईत दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ६ वर्षीय मुलीवर केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेनं अवघा देश हादरला असतानाच, मुंबईत सहा वर्षांच्या मुलीवर एका व्यक्तीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आतापर्यंत महिला आणि मुलींसाठी सुरक्षित असलेलं मुंबई शहर हे असुरक्षित बनलं असल्याचं चित्र आहे.
हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रील विविध भागांत उमटले. विविध संघटना, संस्थांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळं अवघं देश हादरलं असतानाच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील कुर्ला परिसरात सहा वर्षांच्या बालिकेवर एका नराधमानं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला असून, त्याला अटक केली आहे.
कुर्ला पश्चिमेकडे एका दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. विजय महल चाळीजवळ या नराधमाचं दुकान आहे. दुकानाबाहेर खेळणाऱ्या मुलीला चॉकलेट देतो असे सांगून त्यानं दुकानात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यानंतर वेदना होऊ लागल्याने मुलीने आईला सांगितले. वेदना असह्य होत असल्याने तिला डॉक्टरकडे नेले असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. दुकानदाराबाबत मुलीने सांगताच तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.  Print


News - Rajy | Posted : 2019-12-04


Related Photos