राईस मिल उद्योजकांनी कॅपटिव्ह सोलर ऊर्जा निर्माण करावी : ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


-२०० एच पी कनेक्शन एक महिन्यात
-आधुनिकतेची कास धरा
-राईस एक्स्पो ला उर्जा मंत्र्यांची भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
प्रत्येक क्षेत्रात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. आधुनिकतेसाठी वीज महत्वाचा घटक आहे. त्या सोबतच वीज निर्मिती हा एक उद्योग सुद्धा आहे. राईस मिल उद्योजकांनी एकत्र येऊन कॅपटिव्ह सोलर ऊर्जा निर्माण करावी शासन त्याला परवानगी देईल, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते जलाराम लॉन गोंदिया येथे आयोजित राईस मिल मशिनरी एक्स्पो सोहळ्यात बोलत होते. 
 पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, अखिल भारतीय राईस मिलर असोसिएशनचे अध्यक्ष तारसेम सैनी, छत्तीसगड राईस मिलर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, गोंदिया राईस मिलर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, प्रफुल्ल गोयल, जी.बी.राव, मोहन रेड्डी व प्रमोद जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 कमी पाणी व कमी विजेचा वापर करून धान पीक घेता असे सांगून ना. बावनकुळे म्हणाले की, जशी शेतीला आधुनिकीकरणाची जोड देण्याची गरज आहे तसेच उद्योगाला सुद्धा आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे.राईस मिलर असोसिएशनने याबाबत पुढाकार घ्यावा व हा उद्योग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसीत करावा. विजेची वाढती मागणी व त्या प्रमाणात निर्मिती पाहता आता उद्योगांनी वीज निर्मितीकडे वळण्याची गरज त्यांनी विषद केली.
 राईस मिलर असोसिएशनने एकत्र येऊन कॅपटिव्ह सोलर ऊर्जा निर्माण करावी. ही ऊर्जा वहन करण्याचा भार महावितरण उचलेल असे ते म्हणाले. सोलर ऊर्जा स्वस्त दरात उपलब्ध होणार असल्याचे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. यासाठी लागणारी परवानगी शासन देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगासाठी लागणारे २०० एचपीचे कनेक्शन अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत देण्यात येते असे ते म्हणाले.      गोंदिया जिल्ह्यात राईस पार्क व्हावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारचा राईस पार्क सध्या कर्नाटक राज्यात बनत असून तो अद्याप पूर्ण झाला नाही असे ते म्हणाले. तांदूळ हे आपले मुख्य अन्न असून या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना येणाऱ्या अडचणींची जाणीव शासनाला आहे. शासन याबाबत सकारात्मक पावले उचलत असून पालकमंत्री म्हणून मी आपल्या सोबत असल्याचे ना. बडोले यांनी यावेळी सांगितले. 
 १५० मिलियन टन धान उत्पादन देशात होते. सर्वाधिक लोकप्रिय अन्न म्हणून भाताला पसंती आहे. इतर धान्यांच्या तुलनेत ४० टक्के उत्पादन धानाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच राईस मिलरचाही विचार केला जावा असे सांगून अशोक अग्रवाल म्हणाले की, शासनाने चावला उद्योगाला कृषीचा दर्जा प्रदान करावा.धानासोबतच शासनाने तांदूळही खरेदी करावा अशी मागणी अशोक अग्रवाल यांनी केली. आमदार गोपालदास अग्रवाल व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचे यावेळी भाषण झाले. या प्रदर्शनाला विविध राज्यातील राईस मिलर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gondia | Posted : 2018-09-16


Related Photos