विजेच्या प्रश्नावर ऊर्जा मंत्र्यांची लोकप्रतिनिधींसोबत चर्चा


-३०३ शाळा अपघात स्पॉट मुक्त करा
- ग्रामीण पथ दिव्यांसाठी ८ कोटी
- कृषी पंपांना एचपीचेच दर
-घरावरून जाणाऱ्या वीज तारेची तपासणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, नगराध्यक्ष, सभापती व जिल्हा परिषद यांच्या सोबत चर्चा केली असून लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी, आमदार विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुखदेव शेरकर व जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते.
 जिल्हा परिषदेच्या ३०३ शाळा विजेच्या अपघात स्पॉट क्षेत्रात येत असल्याचा मुद्दा या बैठकीत आला असता ऊर्जा मंत्री बावनकुळे म्हणाले की, महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी या सर्व शाळा अपघात स्पॉट मुक्त करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. यासाठी लागणारा ६. १८  कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अधिकच्या निधीची आवश्यकता भासल्यास तशी तरतूद जिल्हा नियोजन मधून करण्यासाठी पालकमंत्री
राजकुमार बडोले यांना विनंती करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना हार्स पावरच्या दरानेच वीज देयक आकारण्यात येते असे सांगून ना.बावनकुळे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत मिटर आहे त्यांनाच मिटर प्रमाणे देयक आकारले जाते इतरांना हार्स पावरचे देयक पाठविले जाते. कृषी पंपांना ३ फेजची १२ वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे. ज्या ठिकाणी १२ तास ३ फेज वीज मिळणार नाही त्या भागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळालीच पाहिजे असे ते म्हणाले.
 काही गावात नागरिकांच्या घरावरून विजेचे तार गेले आहेत. अशा ठिकाणी अपघात होण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. यावर बोलताना ना. बावनकुळे म्हणाले की, घर पहिले बांधले होते की, वीज तारा पहिले टाकल्या होत्या याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. तरी सुद्धा अशा ठिकाणच्या घरांची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करावी व योग्य ती कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. अपघात होऊन गरीब नागरिकांचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
 शेतकऱ्यांसाठी  महावितरण आपल्या दारी योजना यापूर्वी राबविण्यात आली होती त्या योजनेतील पूर्व विदर्भातील कनेक्शन नियमित करण्यात येणार असल्याचे यावेळी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. एक शेतकरी एक रोहित्र ही योजना महावितरणने आणली असून या योजनेत ३४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्यात येईल असे ऊर्जा मंत्री यांनी सांगितले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपआपल्या भागातील विजेच्या समस्या मांडल्या.  Print


News - Gondia | Posted : 2018-09-16


Related Photos