डेव्हिड वॉर्नरचं पाकविरुद्ध गुलाबी चेंडूवर त्रिशतक ; विराट कोहलीला मागे टाकले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / ॲडलेड :
  येथील ओव्हल मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानं खणखणीत त्रिशतक ठोकलं आहे. गुलाबी चेंडूवर त्यानं हे त्रिशतक झळकावलं. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. त्यात वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा समावेश आहे. ३८९ चेंडूंमध्ये त्यानं हे त्रिशतक पूर्ण केलं. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं दिमाखात हे त्रिशतक साजरं केलं. तो ३३५ धावांवर नाबाद राहिला. ब्रॅडमन आणि नंतर टेलर यांचा विक्रम मोडल्यानंतर ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केला.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर यानं १९९८ मध्ये पेशावर येथे नाबाद ३३४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर वॉर्नरनं हा पराक्रम केला आहे. सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातलं हे चौथं वेगवान त्रिशतक ठरलं आहे. सर्वात वेगवान त्रिशतक ठोकण्याचा विक्रम भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. २००७-०८ साली चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यानं अवघ्या २७८ चेंडूंमध्ये त्रिशतक झळकावलं होतं.
वॉर्नर हा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळताना पुण्यात २५४ धावांची खेळी केली होती. वॉर्नर आज त्याला मागे टाकलं.  Print


News - World | Posted : 2019-11-30


Related Photos