नागरिकांनी नक्षल बॅनरची होळी करत दर्शविला नक्षल सप्ताहाला प्रखर विरोध


- पोलिस अधीक्षकांकडून ग्रामस्थांचे कौतूक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षलवादी हे 2 ते 8 डिसेंबर दरम्यान पीएलजीए नक्षल सप्ताह पाळणार आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्हयातील उपविभाग भामरागड अंतर्गत येणारया पोलिस मदत केंद्र धोडराज हदीतील मेडपल्ली व हिंदेवाडा या ठिकाणी सप्ताह पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करणारे बॅनर लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्नक केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न धोडराज पंचक्रोशीतील नागरिकांनी हाणून पाडत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी ’नक्षलवादी मुर्दाबाद, पोलिस प्रशासन जिंदाबाद‘च्या घोषणा दिल्या.
गडचिरोली पोलिस दल आमच्यासाठी नेहमीच जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, शांती मेळावे आदी कार्यक्रम राबवून आम्हा आदिवासी बांधवांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत असतात. याउलट नक्षलवादी निष्पाप नागरिकांचा खून करुन समाजामध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर आमच्यापर्यंत सोयीसुविधा पोहचू नये यासाठी सप्ताहाच्या नावाखाली रस्त्यावर झाडे पाडून आमचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असतात. या नक्षलवाद्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येवून नक्षल सप्ताहाला प्रखर विरोध दर्शवत नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनरची होळी करत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. लोकशाही व संविधान न मानणारे नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु धोडराज येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेवून नक्षली सप्ताहाला विरोध करण्याबरोबरच नक्षली बॅनरची होळी केली. याबददल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी धोडराज पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे कौतूक केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-29


Related Photos