वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी 'विदर्भ मिशन २०२३' आंदोलन तीव्र करणार


- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ‘विदर्भ मिशन 2023’ आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्याकरिता विदर्भातील सर्व जिल्हयातील पदाधिकांच्या व कार्यकर्त्यांना भेटून माहिती देण्यात येत आहे. आगामी आंदोलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी सभा घेण्यात येत आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या, 2 डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने विदर्भात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षा रंजना मामर्डे, जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, शहर अध्यक्ष रमेश भुरसे, प्रभाकर वासेकर, समय्या पसुला, जनार्धन साखरे, संदीप रामटेके, पांडूरंग घोटेकर, विकेश भुरसे, परशुराम सातार आदी उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्य 31 डिसेंबर 2023 पर्यंत कसे मिळवून घेता येईल यासाठी आंदोलनाचे व इतर कार्यक्रमांचे ॲक्शन प्लॅन तयार केले आहेत. वीज विदर्भात तयार होते. मात्र वीज बिलात सरकार विदर्भाच्या जनतेची लुट करीत आहे. त्यामुळे विजेचे बिल निम्मे झाले पाहिजे, अशी विदर्भ राज्य समितीची मागणी आहे. जोपर्यंत विजेचे दर निम्मे होणार नाही तोपर्यंत बिलावरील अन्यायकारक कर, स्थीर आकार, वीज वहन कर देणार नाही. स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती करणे, जिल्हा, तालुका व गाव स्तरावर फलक लावण्यात येणार आहेत. हे आंदोलन 2 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात येणार असून या दिवशी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना साकडे घालून 1 दिवसांचे उपोषण करण्यात येणार आहे. 24 डिसेंबर 2019 रोजी सर्व जिल्हा, तालुका स्तरावर 1 दिवसीय उपोषण करण्यात येईल, वीज दर निम्मे करा, शेतीपंपाचे बिल संपवा, लोडशेडींग संपवा यासाठी जानेवारी महिन्यात नागपूर, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, अमरावती येथील मुख्य अभियंता महावीज वितरण कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोल, 10 फेब्रुवारी 2020 रोजी सर्व जिल्हा व तालुकास्तरावर रास्तारोको, जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी नागपूर येथे रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत आंदोलनामधील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकत्र्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल व विदर्भस्तरीय 100 कार्यकत्र्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. मार्च महिन्यात 2 ते 4 दिवसांकरिता तेलंगणा राज्यात विदर्भातून 100 कार्यकर्ते जावून तेथील सरकारला भेटून त्या लहान राज्याचा कसा गतीने विकास झाला याचा अभ्यास करण्यासाठी व बघण्यासाठी एका सहलीचे आयोजन केले आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात विदर्भभर सभा, संमेलने, युवक मेळावे, महिला मेळावे घेवून जनजागृती व सभासद नोंदणी करण्यात येणर आहे. त्यानंतर 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-28


Related Photos