महिनाभरानंतर नवनिर्वाचित २८२ आमदारांनी घेतली शपथ ; सहा आमदार अनुपस्थित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
 राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर आज, बुधवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. २८८ आमदारांपैकी २८२ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली, तर सहा आमदार अनुपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज, बुधवारी विधानभवनात पार पडलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय संविधानाच्या प्राप्त अधिकाराचा वापर करून हे अधिवेशन आमंत्रित करण्याचे निर्देश विधिमंडळाच्या सचिवांना दिले होते. तसेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची मंगळवारी नियुक्ती केली होती. आज सकाळीच विधानसभेच्या अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं. नव्या विधानसभेतील २८८ आमदारांपैकी २८२ आमदारांना कोळंबकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. शपथविधीनंतर विधानसभेचे हे एका दिवसाचे अधिवेशन संपले. या शपथविधीला सहा आमदार अनुपस्थित राहिले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्याला सुरुवात झाली. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि समान वाट्यावरून संघर्ष सुरू झाला. या सत्तासंघर्षामुळं भाजप आणि शिवसेना यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला. ही महाविकास आघाडी आकाराला येत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. अजित पवार यांचे मन वळवल्यानंतर ते राष्ट्रवादीकडे परत आले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असल्यानं अजित पवार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अजित पवार हे विधानभवनात येताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे बंडाविषयी विचारणा केली. त्यावर मी राष्ट्रवादीसोबतच आहे, शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांच्यासह नवनिर्वाचित आणि युवा आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, क्षीरसागर यांच्यासह २८२ आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर आमदारकीची शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली. त्यानंतर हे एका दिवसाचे अधिवेशन संपले.
पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेणारे आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. आम्ही नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. माझ्यासह अनेक आमदारांनी पहिल्यांदाच शपथ घेतली. आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-27


Related Photos