तुमसर न. प. चे लेखापाल अनुराग बोडे अडकले एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
जिल्हयातील तुमसर येथील नगर परिषदेतील लेखापाल अनुराग उद्धवराव बोडे (33) यास 30 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील अधिकाऱ्यांनी 25 नोव्हेंबर 2019 रोजी अटक केली आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकरी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून नगर परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हा मोहाडी, जि. भंडारा येथील रहिवासी असून ते फोटोग्राफीचे काम करतात. तक्रारदाला मुुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद तुमसर यांच्या आदेशान्वये नगर परिषद तुमसर परिसरात सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये भरारी पथकासोबत व्हीडिओ कॅमेरऱ्यांव्दारे रोड शो, बॅनर होर्डींग इत्यादीचे तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी चित्रीकरण केले. तसेच झोनल अधिकारी सोबत मतदानाच्या साहित्य वाटपासून ते मतमोजणीच्या दिवसांपर्यंत एकूण 20 दिवस चित्रीकरण केले होते. तक्रारदाराने केलेल्या कामाचे बिल एकूण 3 लाख 25 हजार रुपये मंजूर करण्याच्या संबंधाने नगर परिषद तुमसर येथील कार्यरत लेखापाल यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदारास प्रलंबित असलेले बिल काढून देण्याकरिता 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंणक विभाग भंडाराचे पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करुन नगर परिषद तुमसर येथील लेखापाल याच्याविरुद्ध सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये 8 जुलै 2019 व 11 जुलेै 2019 रोजी पडताळणी करुन 25 नोव्हेंबर 2019 रोजी मागणी केल्याप्रमाणे 30 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने तुमसर नगर परिषदेचे लेखापाल अनुदाग उद्धवराव बोडे यास पकडले. याबाबत तुमसर पोलिस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लेखापाल बोडे याच्या नागपूर येथील निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने झडती सुरू केली आहे. सदर कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार गणेश पडवार, पोलिस हवालदार रवींद्र गभने, पोलिस शिपाई कोमल बनकर, चालक पोलिस शिपाई दिनेश धार्मिक आदींनी केली आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-11-26


Related Photos