मी राष्ट्रवादीतच, शरद पवार हेच नेते ; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी जाहीर केली भूमिका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  मुंबई :
बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनी पहिल्यांदाच मौन सोडत एकापाठोपाठ एक १६ ट्वीट केले. यात पहिलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होतं. पंतप्रधान मोदींचे आभार मानत राज्यात जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी मोदींना दिली. याशिवाय त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले.
‘काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. सर्व काही आलबेल आहे. फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांना राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते म्हणून निवडण्यात आलं होतं. याच अधिकाराचा फायदा घेऊन अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि तातडीने शपथविधीही आटोपला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ५१ आमदारांच्या सह्याचे पत्र घेऊन राजभवन गाठले परंतु, राज्यपाल दिल्लीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी पवार कुटुंबीयाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. दुसरीकडे आमदार फुटू नये यासाठी शरद पवार स्वतः काळजी घेत आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. शरद पवारांनी आमदारांशी पुन्हा एकदा चर्चा केली आणि तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, असा प्रश्नही विचारला.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-24


Related Photos