अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनावर गेलेले आमदार तासांतच पुन्हा शरद पवारांकडे परतले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. 'कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आलं होतं. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत आहोत,' असं या आमदारांनी स्पष्ट केलं.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बुलडाण्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके यांनी आज सकाळपासूनचा घटनाक्रम सांगितला.
'काल रात्री १२ वाजता आम्हाला फोन आला. सकाळी सात वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर या. महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगण्यात आलं. नेत्यांचा फोन असल्यामुळं आम्ही गेलो. १०-१५ मिनिटांत तिथं आणखी काही आमदार आले. अजितदादा तिथं नव्हते. थोड्या वेळानं चर्चा करायला जायचं आहे असं सांगून आम्हाला राजभवनावर नेण्यात आलं. छोट्याशा हॉलमध्ये बसवण्यात आलं. तोपर्यंत आम्हाला काहीही माहीत नव्हतं. प्रवासात आम्ही आपसांत चर्चा केली. पण कुणालाही कशाचाही थांगपत्ता नव्हता. आमची चर्चा सुरू असतानाच तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व भाजपचे काही नेते आले. त्यानंतर शपथविधी झाला. आम्ही सगळे अतिशय अस्वस्थ होतो. तिथून थेट निघून साहेबांकडं आलो आणि त्यांच्याशी बोललो. आम्ही पक्षासोबतच आहोत.'
अजित पवार यांच्यासोबत राजभवनवर गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. अजित पवार यांच्या सांगण्यावरून मी राजभवनवर गेलो होतो. गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. तिथं काय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते. पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापि बदलणार नाही,' असं आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-23


Related Photos