पेठा ग्रापंमधील १४ वित्त आयोग, ५ टक्के अबंध निधी, तेंदुपत्ता बोनसच्या रक्कमेत अफरातफर व पथदिव्यांच्या खरेदीची चौकशी करावी


-जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे गावकऱ्यांची निवेदनातून मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी तालुक्यातील पेठा येथील ग्रामपंचायत मधील 14 वा वित्त आयोग, 5 टक्के अबंध निधी, तेंदुपत्ता बोनसच्या रक्कमेत अफरातफर तसेच खरेदी केलेल्या पथदिव्यांच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी व गहाळ झालेल्या ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणातील दोषींवर सात दिवसांच्या आत फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी न झाल्यास व दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या 26 नोव्हेंबर 2019 पासून उपोषण करण्यात येणार असल्याचेही निवेदनात गावकरयांनी म्हटले आहे.
अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील पेठा ग्रामपंचायतमध्ये पेठा, येलारम, कमासूर, तोडका हे गावे मोडतात. सदर गावांच्या तेंदुपत्ता बोनसच्या रक्कमेत अफरातफर झालेली आहे. सन 2017 पासून येथील ग्रामपंचायतीने तेंदुपत्ता बोनसची रक्कम अद्यापही वाटप केलेली नाही. सदर तेंदुपत्ता बोनसची रक्कम ही अंदाजे दीड कोटी रुपये आहे. गावातील रस्त्यावर रोषणाई करण्याकरिता विविध स्वरुपाचे पथदिवे खरेदी करण्यासाठी सदर खरेदी केलेल्या तेंदुपत्ता बोनसच्या रक्कमेतून केलेली आहे. परंतु त्या रक्कमेच्या हक्कदार असलेल्या लोकांना विश्वासात न घेताच सदर रक्कमेची मनमर्जिने विल्हेवाट लावण्यात आली आणि सदर तेंदु बोनसची रक्कमही त्या त्या गावच्या ग्रामसभा कोष समितीच्या खात्यात असते आणि सदर समितीचा अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामपंचायत सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीनेच सदर रक्कम काढण्यात येते. 11 नोव्हेंबर 2019 रोजी ग्रामसभेत मांडण्याच्या उद्देशाने शेकडो लोकांनी ग्रामसभेच्या ठिकाणी जावून ग्रामसभा सुरू होण्याची वाट बघत होते. मात्र पेठा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नीला पोरतेट या ग्रामसभेला हजर झाल्या नाही. महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2014 आणि 18 डिसेंबर 2014 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन परिपत्रक काढून ३ लक्ष रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदी आणि कामांसाठी ई-टेंडरिंग पदधतीचा अवलंब करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले असताना देखील सदर आदेशाची पायमल्ली करीत इतक्या मोठया रक्कमेची खरेदी ही त्यांनी ई-टेंडरिंग पद्धतीने न करता केवळ कोटेशन पदधतीने उरकली असून कुठल्याही स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली नाही. त्यामुळे यात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याची दाट शक्यता असल्याचे गावकरयांनी निवेदनात म्हटले आहे.
सदर झालेल्या बल्ब खरेदी आणि तेंदु बोनसच्या रक्कमेची चैकशी व्हायला पाहिजे. यासाठी आठवडयाअगोदर अहेरी पंचायत समितीचे पेसा समन्वयक आणि संवर्ग विकास अधिकारी यांना सदर ग्रामसभेस उपस्थित राहून झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतु हे दोघही या ग्रामसभेस अनुपस्थित होते. ग्रामपंचायतच्या तेंदु बोनसची जी नोंदवही असते त्यात तेंदुपत्ताच्या संदर्भात संपूर्ण लेखाजोखा असतो. काही महिन्याअगोदर या ग्रामपंचायतमधील ए 1 हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सापडत नव्हते. तेव्हा त्या गहाळ झालेल्या ए 1 चा शोध घेण्यात यावा आणि गहाळ कसे काय झाले याची चौकशी करण्यात यावी, याबाबत मागीलवर्षी 4 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर ए 1 गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु सदर तेंदु बोनसची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली नाही. ही ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील ग्रामपंचायतमध्ये मागील 2017 च्या पूर्वी कुठलाच रेकाॅर्ड सदर ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही आणि तत्कालीन ग्रामसेवक भारुडे यांच्या कार्यकाळातील ही खरेदी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मागील गत वर्षात अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतमध्ये शौचालय घोटाळा झाला होता. याकडे महोदयांनी गांभिर्याने लक्ष देवून पेठा ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या पथदिव्यांच्या खरेदीची चौकशी, तेंदुपत्ता बोनसच्या रक्कमेची अफरातफर प्रकरणाची चौकशी आणि गहाळ झालेल्या ग्रामपंचायत रेकाॅर्डची चौकशी 7 दिवसांच्या आत करण्यात यावी, सन 2014 पासून पेठा ग्रामपंचायतीला मिळालेल्या शासकीय निधीची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी पेठा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अन्यथा 26 नोव्हेंबर 2019 पासून उपोषण करण्यात येणार असल्याचेही गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देताना शिष्टमंडळात नितेश नरायण मुलकरी, रामदास हनमय्या मुलकरी, चंदू लचन्ना पुल्लुरी, श्रीनिवास पोचय्या बंडावार, रामयया लचय्या मुलकरी, लक्ष्मण अंकुलु गोमासे, मोंडक्का पोचय्या पुजारी, मदनक्का मलय्या तुनकळ, अनिता व्येंकटी निलम, सुमित्रा विनोद मुलकरी, सुरेखा शंकर दुर्गे, पुष्पा महेश एनगंदलवार, शालुबाई सोमय्या दुर्गे, सपना विस्तारी सिडाम, निर्मला लिंगय्या मुलकरी, सुजाता बापु नैकुल, सुशीला हनमय्या मुलकरी आदींची उपस्थिती होती.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-20


Related Photos