अंकिसा येथे दारूबंदीसाठी महिलांचा तीन तास चक्काजाम


- १२ गावातील २०० महिलांचा रस्त्यावर ठिय्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
गावातील दारूविक्री बंद करा आणि पोलिसांना नावे दिलेल्या दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी तालुक्यातील अंकिसा येथे सिरोंचाकडे जाणार्‍या रस्त्यावर महिलांनी तीन तास चक्काजाम केला. यात १२ गावातील जवळपास २०० महिला व अंकिसा येथील युवा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन थेट जिल्हा पोलीस मुख्यालय, असा निर्धारही महिलांनी यावेळी बोलून दाखविला. असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काहीच दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गा संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाड मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली. पण अद्याप ठोस कारवाई न झाल्याने दारूविक्री सुरूच आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी अंकिसा – सिरोंचा रस्त्यावर ३ तास चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात बालमुत्तापल्ली, गेरापल्ली, जंगलपल्ली, लक्ष्मीदेवपेठा, लक्ष्मीदेव रै., अंकिसा माल, अंकिसा चक, केवलपेठा, रंगधामपेठा, जोड्पल्ली, दुब्बापल्ली, वडधम येथील जवळपास २०० महिला सहभागी झाले होते. गावात दारूविक्री बंद व्हावी यासाठी युवकही मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. या महिलांच्या रक्षणार्थ तेही आंदोलनात दोन्ही बाजूला मानवी साखळी तयार करून उभे होते.
मुक्तिपथ संघटनेच्या महिलांनी अनेक गावातील दारूविक्री बंद केली. त्यामुळे येथील लोक अंकिसा येथे दारू पिण्यासाठी येतात. तसेच अंकिसा येथे बारसदृश्य दहा दुकाने असून विक्रेते हिंसक प्रवृत्तीचे आहेत. प्रत्येक विक्रेत्याची माहिती गाव संघटनेने पोलिसांना दिली आहे. पण कठोर कारवाई होत नसल्याने विक्री सुरू आहे. तसेच येथील विकेत्यांमुळे आता इतरही गावांतील विक्रेते सक्रिय होत आहेत. परिणामी महिलांना मारझोड करण्याचे प्रकार वाढले आहे. या सर्वांवर आळा बसण्यासाठी आधी अंकिसा येथील विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी महिलांनी केली. चक्काजाम आंदोलनाची दखल घेत असरअली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरेश्वर दराडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. मागणीचे निवेदन देत विक्रेत्यांवर करावी न झाल्यास पुढचे आंदोलन तालुका व जिल्हा पोलीस कार्यालयात करू, असे महिलांनी संगितले. तब्बल तीन तास तासानंतर हे आंदोलन थांबल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
पोलिसांनीच आता पुढाकार घ्यावा
महिलांच्या मागण्या जाणून घेत तुमची साथ असल्यास मी दारू बंद करायला तयार असल्याचे यावेळी दराडे म्हणाले. पण त्यावर संताप व्यक्त करीत महिला म्हणाल्या की, दारूविक्रेत्यांविरोधात एवढे आंदोलन आम्ही करीत आहोत. गावागावातील विक्रेत्यांची यादी तुम्हाला दिली आहे. कित्येकदा अहिंसक कृती आम्ही केली आहे. विक्रेत्यांच्या शिव्या ऐकल्या आहेत. अपमान सहन केले आहेत. पण विक्रेत्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते मोकाट आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी पुढाकार घेत आधी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी मगच आम्ही सहकार्य करू. ही पोलिसांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, अशा शब्दात महिलांनी पोलिसांना सुनावले.
दारूमुळे महिला असुरक्षित
नवर्‍याच्या दारू पिण्यामुळे अनेक महिला शारीरिक व मानसिक हिंसेला बळी पडत आहेत. बालमुत्त्यापल्ली येथील एका महिलेला तिचा नवरा अनेक दिवसांपासून घराच्या बाहेर ठेवत आहेत. तर एकाने दारूच्या नशेत बायकोच्या पोटावर कुर्‍हाडीने वार केला. इतरही गावांमध्ये महिलांना शारीरिक हिंसेला बळी पडावे लागत आहे. याबाबतची माहिती देखील दराडे यांनी महिलांनी दिली. विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून ते दारूविक्री करण्याची हिम्मत करणार नाही व महिला सुरक्षित होतील, अशी मागणी महिलांनी केली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-19


Related Photos